Neha Kakkar : महादेव ऑनलाइन सट्टा ॲप प्रकरणात नेहा कक्करचेही नाव समोर

महादेव ऑनलाइन सट्टा ॲप प्रकरणाची ईडीकडून कसून चौकशी केली जात असून यामध्ये बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींचे नाव समोर आले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरनंतर आता प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचे नाव समोर येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 7 Oct 2023
  • 05:55 pm
Neha Kakkar

संग्रहित छायाचित्र

महादेव ऑनलाइन सट्टा ॲप प्रकरणाची (mahadev betting app)  ईडीकडून (ED) कसून चौकशी केली जात असून यामध्ये बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींचे नाव समोर आले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरनंतर आता प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचे (Neha Kakkar )नाव समोर येत आहे. या प्रकरणात नेहा कक्कर व्यतिरिक्त टायगर श्रॉफ, नुसरत भरुचा, सुखविंदर सिंग आणि सनी लिओनसह १७ सेलिब्रिटींचीही चौकशी केली जाऊ शकते. त्यामुळे बॉलिवूड (Bollywood) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

महादेव ऑनलाइन सट्टा अॅप प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाचा तपास आता अभिनेत्री श्रद्धा कपूरपर्यंत पोहोचला आहे. तपास यंत्रणेने तिला समन्स बजावले असून तिलादेखील रायपूर येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याआधी ईडीने रणबीर कपूरलाही समन्स पाठवले आहे. रणबीरने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर आज पुन्हा बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. 

रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, हिना खान आणि हुमा कुरेशी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, रणबीर कपूर, कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांनी संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. 

रोख रक्कम घेतल्याचे नेहावर आहेत आरोप

या प्रकरणी चौकशीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने ४१७ कोटी रुपयांची रोकड आणि मालमत्ता जप्त केली. या प्रकरणी सौरभ चंद्राकर आणि त्याचा व्यावसायिक भागीदार रवी उप्पल यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे. सौरभ चंद्राकर याचवर्षी यूएईमध्ये विवाहबद्ध झाला. हे लग्न इतके आलिशान होते की त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. सौरभच्या लग्नात नेहा कक्करनेही इतर स्टार्ससोबत परफॉर्म केले. त्याचा व्हिडिओही  मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार नेहाला या परफॉर्मन्ससाठी रोख रक्कम मिळाली होती. मुंबईतील एका इव्हेंट कंपनीने तिला हे पैसे दिले होते.

नेहाच्या करिअरवर होऊ शकतो परिणाम 

महादेव ऑनलाइन सट्टा अॅप प्रकरणात नेहा कक्करचे नाव समोर आल्यामुळे तिच्या करिअरवर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिचे 'बुहे डायन' हे गाणे रिलीज झाले आहे. आता महादेव अॅप प्रकरणात नेहाचे नाव आल्यास ते तिच्या करिअरसाठी घातक ठरू शकते. तिचे आगामी प्रोजेक्ट्सही हिसकावले जाऊ शकतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story