क्रीतीही डीपफेकच्या विळख्यात!
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे जीवन अधिक सुखमय झाले असले तरी यामुळे अनेकांच्या आयुष्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना धोकादेखील निर्माण झाला आहे. खासकरून सेलिब्रिटीजसाठी हा मोठा धोका आहे. अलीकडेच बॉलिवूडची अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandana) डीपफेक व्हीडीओने चांगलीच खळबळ उडवली होती. ब्रिटनमध्ये असलेल्या मूळ भारतीय वंशाची झारा पटेलचा हा व्हीडीओ असून तिच्या मूळ चेहऱ्याऐवजी रश्मिका मंदानाचा चेहरा बसवून व्हीडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. रश्मिकापाठोपाठ काजोलचाही असाच डीपफेक व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. (Kriti Sanon Deepfake)
काहीच दिवसांपूर्वी आलिया भट्टच्या डीपफेक व्हीडीओची खूप चर्चा झाली होती. आता बॉलिवूडची सध्याची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री क्रीती सॅननचा (Kriti Sanon) डीपफेक व्हीडीओ समोर आला आहे. या बनावट व्हीडीओ बनवणाऱ्या लोकांनी बॉलिवूड अभिनेत्रींना आपले लक्ष्य बनवल्याचे दिसत आहे. ‘kritisanon.ilyy’ या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हा व्हीडीओ शेअर करण्यात आला असून त्यात एका हॉट आणि बोल्ड अवतारात क्रीती अंगप्रदर्शन करताना दिसत आहे.
ही मॉडेल वेगळी असून तिच्या चेहऱ्याच्या जागी क्रीतीचा चेहेरा लावण्यात आला आहे. अन् ती अश्लील हावभाव करताना दिसत आहे. हा व्हीडीओ खोटा आहे हे कळून येत असलं तरी बऱ्याच लोकांचा काही काळापुरता गोंधळ होत आहे. या व्हीडीओच्या खाली बऱ्याच लोकांनी कॉमेंटमध्ये हा व्हीडीओ रिपोर्ट करावा अशी विनंतीही केली आहे. एवढेच नव्हे तर या प्रोफाइलवर क्रीतीचे असेच काही बोल्ड, अश्लील आणि आपत्तीजनक व्हीडीओज आणि फोटो पाहायला मिळतात. क्रीतीच्या व्हायरल डीपफेक व्हीडीओमुळे मात्र सायबर सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
सेलिब्रिटीजच्या चेहऱ्याचा असा होणारा गैरवापर पाहून बऱ्याच लोकांनी या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. रश्मिका मंदानाच्या व्हीडीओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बिहारमधून १९ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता लवकरच आलिया भट्ट आणि क्रीती सेनॉनच्या या व्हीडीओ प्रकरणावरही त्वरित कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. केवळ रश्मिका, काजोल किंवा क्रीतीच नव्हे तर सारा तेंडुलकर, शुभमन गील, कतरिना कैफ यांचेदेखील असेच फोटो आणि व्हीडीओ मध्यंतरी व्हायरल झाले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.