संग्रहित छायाचित्र
कंगना रनोटचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. राजकीय मुद्द्यांवर आधारित हा चित्रपट बनवताना तिला खूप अडचणींचा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले. यामुळे भविष्यात कधीही राजकीय चित्रपट करणार नसल्याचे कंगनाने जाहीर केले आहे. एका मुलाखतीत कंगनाने सांगितले की, ‘‘मी पुन्हा कधीही कोणताही राजकीय चित्रपट करणार नाही. बरेच लोक असे का करत नाहीत,हे आता माझ्या लक्षात आले आहे. मला वाटते की अनुपम खेर जी यांनी ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये मनमोहनसिंग यांच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. पण जर तुम्ही मला विचाराल तर मी पुन्हा कधीही असा चित्रपट बनवणार नाही.’’
कंगना म्हणाली, ‘‘या चित्रपटाच्या सेटवर मी माझा संयम कधीच गमावला नाही. जर तुम्ही निर्माता असाल तर तुमचा राग कशावर कमी होईल? दिग्दर्शक म्हणून निर्मात्याशी भांडू शकता. पण जर तुम्ही दोन्ही भूमिका करत असाल तर तुम्ही कोणाशी भांडू शकता? मला मोठ्याने सांगायचे होते की मला जास्त पैसे हवे आहेत आणि मी आनंदी नाही. पण मी कुठे जाऊन रडणार? कोणाला काय म्हणणार, असे सांगत कंगनाने आपली व्यथा व्यक्त केली.
अभिनेत्री म्हणाली, आम्ही कोविडदरम्यान शूटिंग करत होतो. माझ्याकडे एक आंतरराष्ट्रीय क्रू होता. ते खूप कडक आहेत. त्यांना दर आठवड्याच्या अखेरीस पैसे भरावे लागतात. शूटिंग होत नसतानाही त्यांना पैसे द्यावे लागले कारण ते माझ्या चित्रपटाशी संबंधित होते. त्यानंतर आसाममध्ये पूर आला. मला इतर समस्यादेखील होत्या, ज्यांचा मी सामना करत होते. हा चित्रपट करण्यासाठी मी धडपडत होते. मला खूप असहाय्य वाटले. मी निराश व्हायचे, पण मी माझी निराशा कोणाला दाखवू शकत नव्हते.’’
६ जानेवारी रोजी या चित्रपटाचा नवीन ट्रेलर सोशल मीडिया ‘एक्स’वर शेअर केला. जर्नेलसिंग भिंद्रानवाला आणि शिखांना खलिस्तानी दाखवणारी आणि चुकीच्या पद्धतीने चित्रित सर्व दृश्ये नवीन ट्रेलरमधून काढून टाकण्यात आली आहेत. यापूर्वी, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर मागील वर्षी १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये शिखांना गोळ्या झाडताना दाखवण्यात आले होते. त्यांना दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप शिखांनी केला होता. फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंग तसेच शिखांची सर्वोच्च संस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरच्या दृश्यावर आक्षेप घेतला होता. आता सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट मागील वर्षी ६ सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता, परंतु त्याला सेन्साॅर बोर्डाकडून मंजुरी मिळाली नाही.
शीख संघटनांच्या आक्षेपानंतर चार महिन्यांपूर्वी सीबीएफसीने चित्रपटाचे प्रमाणपत्र थांबवले होते. सीबीएफसीने या चित्रपटातील तीन दृश्ये हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासोबतच चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्यात दहा बदल करावे, अशा कडक सूचनाही देण्यात आल्या होत्या. यावर कंगनाने संतापही व्यक्त केला होता. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १०७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीतील आणीबाणीवर आधारित आहे. त्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात धोक्याचे कारण देत संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली होती.