संग्रहित छायाचित्र
मनी लाॅंड्रिंग प्रकरणामध्ये तुरुगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने नववर्षाच्या सुरुवातीला आपली प्रेयसी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला आणखी एक प्रेमपत्र लिहिले आहे.
या पत्रात सुकेशने जॅकलीनची माफी मागितली आणि आगामी 'फतेह' या चित्रपटासाठी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. सुकेशने लिहिले, ‘‘हा चित्रपट पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. बेबी, तुझ्यासोबत जे काही घडले त्याबद्दल मला पुन्हा माफ कर. आपल्या नात्यात २०२५ ही नवीन सुरुवात असेल. मी वचन देतो की तुला माझा आणि आपल्या प्रेमाचा अभिमान वाटेल.’’
२०२५ हे वर्ष ९ या मूलांकाचे वर्ष आहे. या वर्षी मी तुझ्यावरचे माझे प्रेम सिद्ध करणार आहे. मी आपल्या प्रेमाचे सर्वात मोठे आश्चर्य या जगासमोर मांडणार आहे, ज्यांना वाटते की मला वेड लागले आहे आणि आपले प्रेम भीतीदायक आहे, असेही सुकेशने पत्रात नमूद केले आहे.
जॅकलीनला उद्देशून सुकेश म्हणतो, ‘‘बेबी, मी तुझ्यासाठी वेडा आहे, यात शंका नाही. तू नेहमी म्हणते, त्याप्रमाणे आपण जुन्या पद्धतीचे लोक आहोत. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी प्रेम या शब्दाचा अर्थ खरोखरच समजला असेल तर तुम्ही त्याच्या/तिच्या प्रेमात अधिक वेडे होता. माझेही तसेच झाले आहे.’’
सुकेश गेल्या काही वर्षांपासून २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान जॅकलीनचे सुकेशसोबत एकेकाळी रिलेशनशिप असल्याचे समोर आले. त्यामुळे तिचीही चौकशी झाली. स्वत:ला बिझनेसमन म्हणवणाऱ्या सुकेशचे जॅकलीनसोबत संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने तिला अनेक महागड्या आणि मौल्यवान भेटवस्तूही दिल्या. दुसरीकडे, जॅकलीनने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, सुकेश हा फसवणूक करणारा आहे हे तिला माहिती नव्हते.
गेल्या अनेक महिन्यांपासून सुकेश तुरुंगातून जॅकलीनला खास प्रसंगी नियमितपणे प्रेमपत्रे लिहित असतो. जॅकलीनच्या वकिलाने या पत्रांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याचा वाईट परिणाम जॅकलीनच्या प्रतिमेवर होत आहे, असे त्याचे म्हणणे होते. मात्र, ही मागणी कोर्टाने अमान्य केली.
येत्या काही दिवसांत जॅकलीन तीन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यात ‘फतेह,’ ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हाऊसफुल फाइव्ह’ यांचा समावेश आहे. feedback@civicmirror.in