संग्रहित छायाचित्र
आपल्या संगीताने आणि गायकीने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे संगीतकार-गायक ए. आर. रेहमान यांच्या विविध भाषांमधील गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. जगभरातील आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
रेहमान यांचे लाईव्ह शो सतत सुरू असतात. मध्यंतरी पुण्याच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान वेळेचं बंधन न पाळल्याने त्यांचा शो पोलिसांनी बंद केला होता. आता पुन्हा एकदा रेहमान यांची कॉन्सर्ट काहीशा वादामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच रेहमान यांचा चेन्नईमध्ये ‘मक्कुम नेन्जाम’ या नावाने एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. या मैफलीच्या ढिसाळ नियोजन आणि व्यवस्थापनामुळे बऱ्याच चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
रविवारी चेन्नईच्या बाहेरील परिसरात ही कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती अन् हजारो लोकांनी यासाठी गर्दी केली होती. परंतु, अत्यंत वाईट नियोजन केल्याने तिथे चेंगराचेंगरीसारखी दृश्ये पाहायला मिळाली. याबद्दल रेहमानच्या चाहत्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. अपेक्षेपेक्षा जास्त माणसं कॉन्सर्टला हजर होती, बऱ्याच लोकांकडे तिकीट असूनही त्यांना प्रवेश मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका चाहत्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “२००० रुपयांचे तिकीट काढूनसुद्धा इतकी बेकार परिस्थिती पाहायला मिळत आहे. अत्यंत ढिसाळ नियोजन आणि कार्यक्रम. आत प्रवेश न मिळताच परत घरी जावे लागले आहे.” बऱ्याच लोकांनी या चेंगराचेंगरीबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नुकतेच ‘एसीटीसी इव्हेन्ट’ या कंपनीने याबद्दल खेद व्यक्त करत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रेहमान आणि त्यांच्या चाहत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. याबरोबरच त्यांनी लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. हे ट्वीट खुद्द रेहमान यांनीही शेअर केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.