संग्रहित छायाचित्र
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राज्यातल्या २८८ मतदारसंघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे जवळपास १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी उमेदवारी अर्ज हे कणकवली विधानसभा मतदार संघात दाखल झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. या मतदारसंघात तब्बल १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण उमेदवार आहे. त्यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. या मतदार संघात त्यांची लढत काँग्रेसबरोबर होत आहे. भोकर प्रमाणेच औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातही तब्बल १११ उमेदवारी अर्ज आले आहे. भोकरनंतर सर्वात जास्त उमेदवारी अर्ज जर कुठल्या मतदार संघात दाखल झाले असतील तर ते औरंगाबाद पूर्वमध्ये आले आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि बीड या मतदारसंघातही जवळपास १३८ उमेदवारी अर्ज आले आहेत. ज्याप्रमाणे भोकरमध्ये सर्वात जास्त अर्ज आले तसेच कोकणातील कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात कमी अर्ज आले आहे. या मतदार संघात केवळ ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे हे मैदानात आहेत. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचे आव्हान आहे. या शिवाय मलबार हील ११ अर्ज, रत्नागिरी १२,डोंबिवली १३ बोरीवली १३, चारकोप १४, दापोली १४, भिवंडी ग्रामिण १५, भांडूप वेस्ट १३, शिवडी १३, अंधेरी वेस्ट १५, या मतदारसंघात सर्वात कमी अर्ज आले आहेत.
मुंबईत सर्वात जास्त अर्ज हे अणुशक्तीनगर मतदारसंघात आले आहेत. या मतदारसंघात ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्या खालोखाल मानखूर्द शिवाजीनगर मतदारसंघात ४३ अर्ज आले आहेत. अणूशक्ती नगर मतदार संघातून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक निवडणूक रिंगणात आहे. तर शिवाजीनगर मानखुर्द मतदार संघातून नवाब मलिक हे रिंगणात आहेत. या मतदारसंघात मलिक विरुद्ध समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदे गटानेही या मतदारसंघात उमेदवार दिला आहे.