क्रिकेट खेळताना आला हार्टअटॅक
जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना एका ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका येवून हा तरुण आपल्या सहकाऱ्यांच्या समोर मैदानावरच कोसलळा. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. युवकाच्या अशा मृत्यूमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळताना एका 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने ग्राउंडवरच मृत्यू झाला. विजय पटेल असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी जालना शहरातील 'फ्रेजर बॉईज' या मैदानावर ख्रिसमस निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरू होते. या सामन्याच्या दरम्यान बॅटिंग करत असताना विजय पटेल या तरुणाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो जागेवरच कोसळला.
त्यानंतर, मैदानावरील सहकारी खेळाडूंनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे सिक्सर मारल्यानंतर विजय आपल्या सहकारी मित्रासोबत चर्चा करत होता. त्या चर्चेनंतर तो अचानक खाली कोसळला.
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि ताण-तणावामुळे अनेक वेळा हृदयविकाराच्या समस्या उद्भवतात. विशेषतः अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही क्रिकेट खेळताना किंवा बसल्या जागेवर तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.