संग्रहीत छायाचित्र
पुणे- काही दिवसांपुवर्वी राज्यातील काही शहरात बाईक टॅक्सीसेवा सुरु करण्यात आली होती. मात्र रिक्षा संघटनांनी केलेल्या आरोपांमुळे परिवाहन विभागाने यावर कारवाई करत दुचाकी टॅक्सी सेवा बंद केली होती. मात्र आता ती पुन्हा सुरु होणार आहे. राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी मसुदा तयार केला आहे.
महाराष्ट्र अॅग्रीगेटर रेग्युलेशन २०२४ असे या मसुद्याचे नाव असून मोटर वाहन विभागाने हा मसुदा नुकताच मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडला. परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला दुजोरा दिला आहे. ही नियमावली प्रवाशांच्या सुरक्षेला प्राथमिकता देऊन तयार केल्याचे ते म्हणाले. हा एक नीतिगत निर्णय आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यांत तो लागू केला जाणार आहे, असे ते म्हणाले.
बाईक टॅक्सीमुळे नवा रोजगार निर्माण होणार आहे. याव्दावे महिलांनाही रोजगार मिळू शकतो. ड्रायव्हर आणि पॅसेंजर यांच्यातील सुरक्षेसाठी दोन सीटच्या मध्ये पुरेशी जागा सोडण्यासाठी स्टँड लावण्याचा विचार देखील आहे. याचा फायदा महिलांना होणार आहे.
दरम्यान, अॅप आधारित चारचाकी किंवा दुचाकी टॅक्सी बोलविल्यानंतर ती १० मिनिटांत आली नाही तर चालकाला १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तो दंड प्रवाशाला दिला जाणार आहे. तसेच एयरपोर्ट, रेलवे स्टेशन आणि हॉस्पिटलसाठी केलेले बुकिंग रद्द केल्यास टॅक्सी चालकाला पाचपट दंड आकारला जाणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी या नियमावलीचे प्रस्तुतीकरण केले आहे.