Walmik Karad custody
खंडणी गुन्हाप्रकरणी अटकेत असणारा वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय घेत कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कराडला किमान पुढचा आठवडाभर तरी जामिनासाठी अर्ज करता येणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
एसआयटी'ने त्याची कोठडी मागताना न्यायालयासमोर मोठा दावा केला. संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यादिवशी वाल्मिक कराड हा सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांच्या संपर्कात होता. त्याने देशमुखांना धमकी दिली. त्यातूनच 'मकोका' लावल्याचा दावा 'एसआयटी'ने न्यायालयात केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
आज न्यायालयात कारडच्या मकोका गुन्ह्यासंदर्भात सुनावणी झाली. यावेळी एसआयटीनं दिलेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुखची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली, त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान 10 मिनिटांच्या कालावधीत सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून एकमेकांशी संभाषण झालं होते, या तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झालं याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या कस्टडीची मागणी SIT तर्फे करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याचंही एसआयटी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
तसेच, सुनावणीदरम्यान एसआयटी अधिकाऱ्यांनी कराडवर यापूर्वी दाखल झालेले गुन्ह्यांची यादी सादर केली. इतर आरोपीविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. वाल्मिक कराडवर MCOCA कसा लावण्यात आला, याचा संदर्भही देण्यात आला आहे. दरम्यान, वाल्मिकने हत्येच्या दिवशीही संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केला आहे. वाल्मिकच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंडस न्यायालयात मांडले. कोर्टातला हा संपूर्ण युक्तिवाद इन कॅमेरा झाला आहे.