ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी आणखी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित (Woman police officer suspended) करण्यात आले आहे. सविता हनुमंत भागवत (Savita Hanumant Bhagwat) असे या सहायक पोलीस निरीक्षक महिलेचे नाव आहे..(Pune Police) ससूनच्या १६ नंबर वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना देखील त्यामध्ये कसूर केल्याचा ठपका पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी ठेवला आहे. ३० सप्टेंबर रोजी दिवसपाळी असतानाही कर्तव्यावर हजर न राहता केवळ अर्धा तास उपस्थित राहिल्यामुळे ललितला एक अज्ञात व्यक्ती भेटली आणि त्यानंतर तो पसार झाला. त्यामुळे कर्तव्यातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित अनिल पाटील याला पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्यास संधी मिळाली, असे नमूद करीत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी हे आदेश काढले आहेत. यापूर्वी दोन अधिकाऱ्यांसह नऊ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.
सविता भागवत यांची नेमणूक मुख्यालयाच्या कोर्ट कंपनी युनिटमध्ये होती. त्यांना ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयात असलेल्य वार्ड क्र. १६ येथे सकाळी ०९.०० ते रात्रौ ०९.०० या वेळेत दिवसपाळी करीता देखरेख अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी उपचारासाठी दाखल असलेल्या बंदी आरोपी यांची कसुन झडती घेणे आवश्यक होते. भागवत यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. देखरेख अधिकारी म्हणून कर्तव्यावर पुर्ण वेळ थांबणे आवश्यक असताना त्या दुपारी १३.३० वाजता तेथून रवाना झाल्याबाबतची नोंद घेण्यात आली आहे. तसेच देखरेख अधिकारी म्हणून पुर्ण दिवसपाळी कर्तव्य असताना फक्त अर्ध्या तासाकरीता ससून हॉस्पीटल येथील वार्ड क्र. १६ येथे भेट दिल्याचे दिसून येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे बंदी आरोपी ललीत पाटील याच्याकडे गुन्हे शाखेला दोन आय फोन मोबाईल फोन आढळून आले आहेत. देखरेख अधिकारी म्हणून ससून हॉस्पीटल, वार्ड क्र. १६ येथील पोलीस गार्डावर योग्य देखरेख न ठेवल्यामुळे एक व्यक्ती आक्षेपार्ह काळया रंगाची सॅक घेवून बंदी आरोपी ललीत पाटील याला भेटण्यास गेला. कर्तव्यातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित अनिल पाटील यास पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्यास संधी मिळाली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे, कर्तव्यात बेजबाबदार, बेफिकीर, निष्काळजीपणाचे गैरवर्तन केल्याने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे सह आयुक्त कर्णिक यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.