'डेटिंग ॲप'द्वारे लुटणारी दूक्कल गजाआड
पुणे : 'सिकींग ॲडवेंचर' या डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर पुरुषांना हॉटेल तसेच खासगी ठिकाणांवर भेटायला बोलवल्यानंतर साथीदाराच्या मदतीने त्यांची लुबाडणूक करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून सिंहगड रस्ता, चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
नितीश नवीन सिंग (वय २५, रा. दिल्ली) आणि कविता ऊर्फ पूजा नवीनचंद्र भाटा (वय २७, रा. उत्तराखंड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरासह महाराष्ट्रातील आणि अन्य राज्यातील लोकांना विशेषत: पुरुषांना 'सीकींग अॅडव्हेंचर' या डेटींग अॅपद्वारे आकर्षीत केले जात होते. त्यांच्याशी चॅटींग करून त्यांना मोबाईलवर मुलीचे फोटो पाठवुन हॉटेल बुक करावयाला लावले जात होते. हॉटेल बुक केल्यावर ग्राहकाकडून ठरलेली रक्कम ऑनलाईन घेऊन तसेच दमदाटी व मारहाण करून जबरदस्तीने आणखी जास्तीची रक्कम ऑनलाईनद्वारे काढून घेतली जात होती. तसेच, ग्राहकाकडील मौल्यवान चिज वस्तु, सोन्याचे दागिणे जबरदस्तीने लुटुन नेले जात होते. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
तसेच सिंहगड रोड पोलीस ठाण्यात देखील आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कविता ऊर्फ पूजा हिने फिर्यादी ३६ वर्षीय तरुणाला भेटायला बोलवून हॉटेल रूम बुक करायला लावत ९० हजार रुपयांना साथीदाराच्या मदतीने लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी ३६ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार पुणे गेट हॉटेल नऱ्हे या ठिकाणी घडला. फिर्यादी तरुण नऱ्हे येथील सन युनिव्हर्स सोसायटीमध्ये राहण्यास आहे. या तरुणाने देखील सिकिंग एडवेंचर या डेटिंग ॲप वर लॉगिन केलेले होते. त्या डेटिंग ॲपवर त्याची आरोपी कविता ऊर्फ पूजा सोबत ओळख झाली. तिने तिचे फोटो टेलिग्रामवर फिर्यादीला पाठवले. तुला भेटायचे आहे असे सांगितले. त्यानुसार या तरुणाने नऱ्हे यातील पुणे गेट हॉटेलमधील रूम बुक केली. आरोपी या ठिकाणी आली. त्याच्यासोबत गप्पा मारत असताना तिने पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत बारा हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला लावले. त्यानुसार या तरुणाने १२ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर या तिने त्याच्याकडे पुन्हा ३८ हजार रुपये ट्रान्सफर करण्याची मागणी केली. त्यावेळी या तरुणाने तिला पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी तिने तिच्या साथीदार असलेल्या नितीशला रूममध्ये बोलावले. हा तरुण रूममध्ये आल्यानंतर त्याने फिर्यादी तरुणाला मारहाण केली. जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. तसेच, त्याची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. अशाप्रकारे एकूण ९० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत त्यांना मारहाण करून दोघेही तिथून पसार झाले.
दरम्यान या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष व सामाजिक सुरक्षा विभागामार्फत सुरू करण्यात आला. त्यावेळी कविता आणि नितीश हे त्यांची ओळख लपवुन गुन्हे करीत असल्याचे समोर आले. त्यांनी वापरलेले विविध इलेक्ट्रानिक गॅझेटसचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करण्यात आला. हे दोघेही नवी मुंबई येथील तुर्भे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पुढील तपासासाठी चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांनी पुणे शहर तसेच इतर राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये नामांकित हॉटेलमध्ये ग्राहकांना रूम बुक करण्यास सांगुन लाखों रुपयांना लुबाडल्याचे तपासात समोर आले आहे. अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास सामाजिक सुरक्षा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, सहायक फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, सागर केकाण, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.