गाईने खाल्ला पिठाच्या गोळ्यामधील गावठी बॉम्ब
पंकज खोले
रानामध्ये चरत असताना बॉम्बसदृश पिठाचा गोळा खाल्लेल्या जंगली गायीच्या तोंडामध्ये स्फोट झाला. कासारसाई (ता. मावळ) येथे हा प्रकार घडला. या घटनेत गाईचा जबडा फाटला असून, त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्या गाईचा शोध स्थानिक शेतकरी व पशुप्रेमी घेत आहे. दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली असून, असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
कासारसाई (Kasarsai) येथील पवळे वस्ती परिसरात विक्रम मुरकुटे या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. दरम्यान, त्यांच्याकडे चारा व पाणी पिण्यासाठी रानातून व डोंगरातून २० ते २५ पशू दिवसाकाठी येत असतात. शनिवारी (२ मार्च) त्यापैकी एका गायीच्या तोंडातून रक्त येत असून, त्याचा जबडा फाटला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार आणखीन काही पशूंना झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी त्यांना सांगितले आहे. मुरकुटे म्हणाले की, या परिसरात पिठामध्ये गावठी बॉम्ब ठेवून परिसरात टाकून देतात. मात्र त्यामुळे पशूंना जीव गमवावा लागतो. काही महिन्यांपूर्वी आमच्याकडे असलेल्या एका कुत्र्याने देखील हा बॉम्ब खाल्ला होता. त्यामुळे असाच काही प्रकार या गाईबाबत झाला असल्याची शक्यता मुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे या प्रकाराने सर्व शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक पशुप्रेमी यांनीही याबाबत परिसरात पाहणी केली. घटनेची माहिती पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना दिली. हा परिसर हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असल्याने, याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांना दिली. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी त्याबाबत माहिती घेण्यासाठी कासारसई परिसरात शोधमोहीम राबवली आहे.
दिघीनंतर मावळात बॉम्बची धास्ती
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये चऱ्होली, वडमुखवाडीतील अलंकापूरम सोसायटीजवळच्या गाईच्या गोठ्याजवळ अशाच प्रकारचा बॉम्बचा स्फोट होऊन एका पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला होता, तर दोन मुले गंभीर जखमी झाली होती. पोलिसांनी शोध घेतला असता परिसरात १२ बॉम्ब सापडून आले आहेत. त्याचप्रमाणे वल्लभनगर एसटी स्टँड या ठिकाणीही असे बॉम्ब सापडले होते. आता मावळ परिसरात अशाच प्रकारचे बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रकारे इथे शोधमोहीम राबवून हे बॉम्ब नष्ट करावेत, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
दोन गाईंची जीभ तुटली
गोळ्यातील बॉम्बस्फोटात दोन गाईंची जीभ तुटली आहे. त्यामुळे त्यांना चारा, पाणी काहीही खाता येत नाही. त्या जास्तीत जास्त दोन दिवस जगतील. पोलीस पाटील व ग्रामस्थांनी या परिसरात शोध घेतला. मात्र त्या गाई माणसांना पाहून पळत सुटल्या आहेत. पळताना झाडांना, दगडांना धडकून आणखी जखमी होत आहेत. त्या घटनेची माहिती मिळाली आहे. त्यासंबंधी गावात पाहणी सुरू असून, तपास सुरू असल्याचे हिंजवडीचे पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख म्हणाले आहेत.
रानातून दुपारी साडेतीन ते चार या वेळेत या जंगली गाई पाण्यासाठी येतात. त्यातील एका गाईचे तोंडाला जखम झाल्याचे दिसून आले. मनुष्य जवळ येताच या गाई पळून जात असल्याने त्यांच्यावर उपचार करणे अवघड आहे.
-विक्रम मुरकुटे, स्थानिक शेतकरी
मावळातील शेतकरी पशुधनप्रेमी आहेत. या ठिकाणी असा प्रकार घडले खेदजनक आहे. पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार देखील केली आहे. ग्रामस्थांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे.
- शिवशंकर स्वामी, पशु कल्याण अधिकारी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.