संग्रहित छायाचित्र
पुणे : स्कायमोटो ऑटो मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड (Union Bank) कंपनीचा संचालक बोलत असल्याची बतावणी करीत कंपनीच्या ईमे आयडीप्रमाणे हुबेहूब बनावट ई-मेल व लेटरहेड (Pune Crime News) तयार करून ते बँकेला पाठवून २२ लाख ९२ हजार ७४६ रुपये ट्रान्सफर करायला सांगत बँकेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारक आणि खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ जानेवारी २०२२ रोजी युनियन बँक ऑफ इंडियाच्या फर्ग्युसन कॉलेज (Ferguson College) रस्त्यावरील शिवाजीनगर शाखेमध्ये घडला होता. याप्रकरणी बँकेकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अवनीकांत निरंजन सामंतराय (वय ३७, रा. राहुल टेरेस सोसायटी, कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामंतराय हे युनियन बँक ऑफ इंडियाच्या फर्ग्युसन कॉलेज रस्ता शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या शाखेमध्ये स्कायमोटो ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे खाते आहे. त्यांना ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी अज्ञात मोबाईल नंबरवरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्कायमोटो ऑटो प्रायव्हेट मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक विवेक सावंत बोलत असल्याचे भासवले. त्यांच्याशी हिंदीमध्ये त्याने संवाद साधयला सुरुवात केली. सामंतराय यांच्याशी बोलत असताना त्याने बँकेतील एफडी आणि त्यावरील व्याजासंदर्भात बोलण्यास सुरुवात केली. त्यांच्या वरिष्ठ साहेबांशी आपली ओळख असून त्यांची मैत्री आहे. दुपारनंतर मी साहेबांना भेटायला येणार आहे अशी बतावणी केली.
त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा त्याने सामंतराय यांना फोन केला आणि अर्जंट पैसे ट्रान्सफर करून हवे असल्याचे सांगितले. माझ्याकडे चेक बुक संपल्याची देखील त्याने बतावणी केली. या कंपनीचे खरोखरीच चेकबुक संपलेले होते. त्यामुळे सामंतराय यांना त्याच्यावर विश्वास बसला. दरम्यान, पैसे हवे असल्याने कंपनीच्या लेटरहेडवर विथड्रोल रिक्वेस्ट पाठवत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार स्कायमोटो ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ईमेल आयडीशी मिळत्याजुळत्या बनावट ईमेल आयडीवरून बनावट लेटरहेडवर पैसे पाठविण्यासाठीचे पत्र बँकेच्या ईमेलवर पाठवण्यात आले. त्यावर तीन वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे पाठवण्यास सांगण्यात आलेले होते. त्यावरील सह्या देखील संचालकांच्या सह्यांशी मिळत्याजुळत्या हुबेहूब होत्या. त्यामुळे सामंतराय यांनी या ईमेलवर नमूद करण्यात आलेल्या तीन बँक खात्यांवर २२ लाख ९२ हजार ७४६ पाठवले.
संध्याकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास बँकेमध्ये स्कायमोटो ऑटो मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून फोन आला. एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार कशाच्या आधारे केले? अशी कंपनीकडून बँकेला विचारणा करण्यात आली. त्यावेळी सामंतराय यांनी 'तुमच्या कंपनीचा ईमेल आला होता. त्यावर लेटरहेडमध्ये पैसे वर्ग करण्याबाबत कळवण्यात आलेले होते.' असे सांगितले. मात्र, कंपनीकडून असे कोणतेही पत्र किंवा ई-मेल पाठवला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बँकेमध्ये पडताळणी करून पाहिले असता तो ईमेल आयडी बनावट असल्याचे समोर आले. निरीक्षक गौड म्हणाले, या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून पोलिसांनी भादवी ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ आयटी ऍक्टर ६६ अ आणि ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.