Pune Crime News : नवनाथ लोधा टोळीकडून तीन पिस्तुल, दोन काडतुसे जप्त

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून डोक्यात गोळी झाडात खून करणाऱ्या सराईत गुन्हेगार नवनाथ लोधा आणि त्याच्या साथीदाराकडून खडक पोलिसानी तपास करीत ३ पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 6 Nov 2023
  • 03:34 pm
Pune Crime News : नवनाथ लोधा टोळीकडून तीन पिस्तुल, दोन काडतुसे जप्त

नवनाथ लोधा टोळीकडून तीन पिस्तुल, दोन काडतुसे जप्त

पुणे : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या (Pune Crime News) वादामधून डोक्यात गोळी झाडात खून करणाऱ्या सराईत गुन्हेगार नवनाथ लोधा आणि त्याच्या साथीदाराकडून खडक पोलिसानी (Khadak police) तपास करीत ३ पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (Navya Suresh Lodha) (वय ३७, रा. कृष्णा हाईटस, घोरपडे पेठ) असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी  रोहित संपत कोमकर (वय २३, रा. श्रीकृष्ण हाईट्स  गुरुवार पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय ४१, रा. चव्हाणनगर, धनकवडी) आणि अमन दीपक परदेशी (वय २९, रा. घोरपडे पेठ) यांनाही अटक केली आहे. अनिल रामदेव साहू (वय ३५, रा. २०१ श्रीकृष्ण हाईट्स, दुसरा मजला, मूळ रा. वाझिदपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ धुरणकुमार हरिदेव साहू (वय २४) याने फिर्याद दिली आहे. अनिल साहू हा साडी विक्रीच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होता. तो मागील तीन वर्षांपासून तो भाडेकरारावर राहात होता. दोन दिवसांपूर्वी लोधा याने साहूकडे पाच हजार रुपये मागितले होते. त्यावेळी साहू याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला होता. त्यावेळी लोधा नाराज झाला होता. रविवारी कोमकर याचा वाढदिवस होता. त्यासाठी सर्वजण इमारतीखाली एकत्र आले होते. त्यावेळी साहू याची लोधा, कोमकर आणि शिंदे यांच्याशी वाद व भांडणे झाली होती. साहू याने लोधाला धक्का दिला होता.  त्याच रागामधून चिडलेल्या लोधाने साहूच्या घरी जाऊन धमकावत पिस्तूल साहूच्या कपाळावर लावले आणि गोळी झाडत त्याचा खून केला होता.

नवनाथ ऊर्फ नव्या हा खून केल्यानंतर पसार झाला होता. तो खेड शिवापूर येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल दुडम व पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक सुनिल माने, निरीक्षक (गुन्हे) संपत राऊत, सहायक निरीक्षक राकेश जाधव यांच्या पथकाने त्याला खेड शिवापुरवरून जेरबंद केले होते. त्याच्याकडे सुरू असलेल्या तपासात गुन्हयात वापरलेले १ गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले. तसेच, त्याचा साथीदार  गणेश शिंदेकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नव्या याच्याविरुद्ध यापुर्वी खडक, मुंढवा व दत्तवाडी पालीस ठाण्यात  दुखापत, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा वापर करुन खुनाचा प्रयत्न, जाळपोळ असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उप निरीक्षक अजीज बेग, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, संदिप तळेकर, सागर घाडगे, लखन ढावरे, आशीष चव्हाण, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, रफिक नदाफ, महिला पोलीस अंमलदार राणी जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest