Anti-Corruption : शिक्षण विभागातील तीन 'भ्रष्टासूर'

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption )(एसीबी) ट्रिपल धमाका करीत टीईटी घोटाळ्यातील (TET scam) आरोपी असलेल्या तुकाराम सुपे, (Tukaram Supe) किरण आनंद लोहार (Kiran Anand Lohar), विष्णू मारुतीराव कांबळे (Vishnu Maruti Kamble) या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी 'काळीमाया' जमवल्याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

Anti-Corruption

शिक्षण विभागातील तीन 'भ्रष्टासूर'

जमवली कोट्यवधींची 'काळी माया', तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रिपल धमाका

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption )(एसीबी) ट्रिपल धमाका करीत टीईटी घोटाळ्यातील (TET scam) आरोपी असलेल्या तुकाराम सुपे, (Tukaram Supe) किरण आनंद लोहार (Kiran Anand Lohar), विष्णू मारुतीराव कांबळे (Vishnu Maruti Kamble) या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी 'काळीमाया' जमवल्याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पुणे, सोलापूर आणि सांगली येथे हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यातील सुपे याच्याकडे ३ कोटी ६० लाख, किरण लोहारकडे ५ कोटी ८६ लाख आणि विष्णू कांबळे याच्याकडे ८३ लाखांची काळी कमाई आढळून आली आहे. भ्रष्ट मार्गाने कमावलेली ही माया एसीबीच्या तपासात आढळून आली आहे.  

तुकाराम नामदेव सुपे (वय ५९, रा.कल्पतरू, गांगर्डेनगर, सुदर्शन हॉस्पिटलसमोर, पिंपळे गुरव) असे पुणे युनिटने गुन्हा दाखल केलेल्या माध्यमिक विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे.

सुपे सध्या सेवानिवृत्त आहे. त्याच्यावर पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी भादवि ४०६, ४०९, ४२०, ४६७ प्रमाणे २०२१ साली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक देखील करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान २ कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपयांची रोकड, ७२ लाखांचे १४५ तोळे सोने अशी ३ कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीने उघड चौकशी सुरू केली होती. सुपे याने १९८६ ते २०२१ या कालावधीत सरकारी नोकरी केली. या कालावधीत त्याने ही अपसंपदा भ्रष्ट मार्गाने कमावल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. सेवा कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता अधिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारणा कायदा २०१८ च्या कलम १३ (१) (ब) १३ (२) प्रमाणे सांगवी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीराम विष्णू शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

यासोबतच सोलापूरमधील सदर बाजार पोलीस ठाण्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण आनंद लोहार  (वय ५०) याच्यासह त्याची पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४) आणि मुलगा निखिल किरण लोहार (वय २५, रा. प्लॉट नंबर सी २, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापूर एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत नेताजी महाडिक यांनी फिर्याद दिली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारणा कायदा २०१८ च्या कलम १३ (१) (ब) १३ (२) सहकलम १२ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किरण लोहार याच्या १५ नोव्हेंबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या शासकीय सेवा कालावधीमधील उत्पन्न व खर्चाचे परीक्षण करण्यात आले. या कालावधीत त्याने उत्पन्नापेक्षा तब्बल ११२ टक्के अधिक माया जमवल्याचे समोर आले. त्याने  भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक अशी ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा कमावली. यामध्ये रोख, जमीन आणि विविध स्थावर व जंगम मालमत्तानचा समावेश आहे. या भ्रष्ट कमाईसाठी त्याची पत्नी सुजाता, मुलगा निखिल यांनी देखील त्याला अपप्रेरणा दिली. तसेच, त्याला भ्रष्ट मार्गाने कमाई करण्यास प्रवृत्त करून सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक गणेश कुंभार करीत आहेत.

एसीबीच्या सांगली युनिटमार्फत सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा तत्कालीन शिक्षणाधिकारी  विष्णू मारुतीराव कांबळे (वय ५९), त्याची पत्नी जयश्री विष्णू कांबळे (दोघे रा.  शिवशक्ती मैदानाच्या पाठीमागे, बारबोले प्लॉट शिवाजीनगर, बार्शी जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारणा कायदा २०१८ च्या कलम १३ (१) (ब) १३ (२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध एसीबी सांगलीचे पोलीस निरीक्षक विनायक संजय भिलारे यांनी फिर्याद दिली आहे. विष्णू कांबळे याच्याकडे एसीबीमध्ये चौकशी सुरू केली होती. त्याच्या १६ जून १९८६ ते ६ मे २०२२ या शासकीय सेवा कालावधीमधील उत्पन्न व खर्चाचे परीक्षण करण्यात आले. या कालावधीत त्याने उत्पन्नापेक्षा तब्बल ३६ टक्के अधिक माया जमवल्याचे समोर आले. त्याने  भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक अशी ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची अपसंपदा कमावली. त्याची पत्नी जयश्री हिने त्याला भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा दिल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

या तीनही प्रकरणांमध्ये एसीबीच्या पुणे विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, डॉ. विजय  चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

तुकाराम सुपे, किरण आनंद लोहार, विष्णू मारुतीराव कांबळे या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी पुणे, सोलापूर आणि सांगली येथे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या अपसंपदेबाबत उघड चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्न स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आढळून आली. याप्रकरणी प्रत्येक युनिटनिहाय तपास सुरू आहे. तपास पूर्ण करून लवकरच शासन मान्यता घेऊन याप्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल.

- अमोल तांबे, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest