गुन्हे शाखेच्या यूनिट एकची कारवाई
मित्राचा वाढदिवस साजरा करताना दारू प्यायल्यानंतर पैशांवरून झालेल्या वादामधून एका सराईत गुन्हेगाराने एका भाडेकरूच्या डोक्यात गोळी झाडत खून केला. ही घटना खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घोरपडे पेठेमध्ये सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळावर पोलिसांना दोन रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या असून तीन ते चार वेळा गोळीबार करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे.
अनिल रामदेव साहू (वय ३५, रा. २०१ श्रीकृष्ण हाईट्स, दुसरा मजला, मूळ रा. वाझिदपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ धुरणकुमार हरिदेव साहू (वय २४) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार नवनाथ लोधा, रोहित संपत कोमकर (वय २३, रा. श्रीकृष्ण हाईट्स गुरुवार पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय ४१, रा. चव्हाणनगर, धनकवडी) आणि अमन दीपक परदेशी (वय २९, रा. घोरपडे पेठ) यांची नावे निष्पन्न केली आहेत. यातील लोधा हा फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवनाथ लोधा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. अनिल साहू हा साडी विक्रीच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होता.
तो मागील तीन वर्षांपासून तो भाडेकरारावर राहात होता. दोन दिवसांपूर्वी लोधा याने साहूकडे पाच हजार रुपये मागितले होते. त्यावेळी साहू याने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला होता. त्यावेळी लोधा नाराज झाला होता. रविवारी कोमकर याचा वाढदिवस होता. त्यासाठी सर्वजण इमारतीखाली एकत्र आले होते. त्यावेळी साहू याची लोधा, कोमकर आणि शिंदे यांच्याशी वाद व भांडणे झाली होती. साहू याने लोधाला धक्का दिला. त्याच रागामधून चिडलेल्या लोधाने साहूच्या घरी जाऊन धमकावत पिस्तूल साहूच्या कपाळावर लावले आणि गोळी झाडत त्याचा खून केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा सुरू करण्यात आला. दरम्यान, पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर, अयाज दड्डीकर आदींच्या खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे आणि परदेशी यांना त्यांच्या घरामधून उचलण्यात आले. तर, कोमकर याला स्वारगेट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशीष कवठेकर, राहूल मखरे, अजय थोरात, अनिकेत बाबर, आयाज दड्डीकर, दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.