पुणे : गस्तीदरम्यान संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोन वेगवेगळ्या वाहन चालकांकडून वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या दोन कारवायांमध्ये चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सोहेल मन्सुर पोटोदे (वय १९, रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) आणि सौरभ राजेंद्र भोसले (वय २३, रा. कोर्टी, सोलापुर) अशी आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते. १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांना पिसोळी येथील आंबेकर हॉटेल चौकामधून सोहेल हा एका मोटारसायकलवरुन जाताना दिसला. त्या मोटारसायकलच्या मागील व पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर खोडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या गाडीच्या कागदपत्राबाबत व लायसन्सबाबत पोलिसांनी विचारणा केली. त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ही मोटारसायकल चोरीची असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने आणखी पाच दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून एकूण ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेले पाच आणि लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेला एक असे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
यासोबतच १३ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी गस्तीवर असताना खडीमशीन चौकाजवळ दुचाकीवरुण जात असलेला सौरभ भोसले हा दिसला. पोलिसांनी त्याला हटकताच तो गाडी सोडुन पळु जाऊ लागला. त्याला ताब्यात घेऊन दुचाकीबाबत चौकशी केली. त्याने हे वाहन चोरीचे असल्याची कबुली दिली. अधिक तपास केला असता आणखी एक दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, लवेश शिंदे, सागर भोसले, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजीत मदन, शाहीद शेख यांनी केली.