पुणे: ‘वसूलदार’ पोलीस आयुक्तांच्या रडारवर! - बेकायदा धंदेवाल्यांचीही घेणार ‘परेड’, अमितेश कुमार यांचा आणखी एक दणका

शहरातील बेकायदेशीर धंद्यांना आश्रय देऊन आपल्या तुंबड्या भरणाऱ्या ‘वसूलदार’ पोलीस कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची संक्रांत कोसळणार आहे. अवैध धंदेवाल्यांकडून पैशांची वसुली करणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचीदेखील आता ‘परेड’ घेतली जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र

शहरातील बेकायदेशीर धंद्यांना आश्रय देऊन आपल्या तुंबड्या भरणाऱ्या ‘वसूलदार’ पोलीस कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची संक्रांत कोसळणार आहे. अवैध धंदेवाल्यांकडून पैशांची वसुली करणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचीदेखील आता ‘परेड’ घेतली जाणार आहे. शहरातील जवळपास ६५ वसूलदार पोलीस कर्मचाऱ्यांची यादीच पोलीस आयुक्तांनी तयार केली आहे. या यादीमधील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. या सर्वांना मुख्यालयामध्ये संलग्न केले जाणार असून त्यांचा पोलीस भरतीदरम्यान होणाऱ्या प्रशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर एक उजळणी प्रशिक्षणवर्ग देखील घेतला जाणार आहे. कोणत्याही प्रकारची पैशांची वसुली, जमिनीच्या आणि आर्थिक व्यवहारातील तोडपाणी, आर्थिक व्यवहारात मध्यस्थी आदी प्रकारची कामे पोलीस करीत असतील तर ते सहन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी घेतली आहे.

पुणे शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद झालेच पाहिजेत असे आदेश दिले होते. यासोबतच शहरातील पब, बार, रूफ टॉप हॉटेल, रेस्टॉरंट्स यांच्यासाठी नियमावलीही केली होती. रात्री दीडनंतर या आस्थापना सुरू राहणार नसल्याचे आदेशदेखील काढले होते. त्याची कार्यवाही आणि अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. दरम्यान, कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणानंतर (Kalyani Nagar Porsche Accident) बेकायदेशीर धंदेवाल्यांसोबत स्थानिक पोलीस ठाणे स्तरावरील आणि गुन्हे शाखेतील काही वसूलदारांच्या बाबतीतील तक्रारी पोलीस आयुक्तांच्या कानावर गेल्या होत्या. पोलीस कर्मचारीच बेकायदेशीर धंद्यांना आशीर्वाद देत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे हे बेकायदेशीर धंदे तत्काळ बंद करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मोहीम हाती घेतली.

मटका, हातभट्टी, जुगार यासह तस्करी, बेटिंग, कमोडिटी, वेश्या व्यवसाय आदी  बेकायदेशीर धंदेवाल्यांकडून तसेच सट्टेबाजार, जमिनीचे व्यवहार करणारे, आर्थिक वादामध्ये पडून त्यांची तोडपाणी करणारे पोलीस आता आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी आयुक्तांनी तयार केली आहे. मागील काही दिवसांपासून या यादीवर काम करण्यात येत होते.  संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या आजवरच्या कामाची जंत्रीच तयार करण्यात आली आहे. त्यांच्या बेकायदेशीर वसुलीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. या संदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आता ‘सुधारण्यात’ येणार आहे. त्यांना मुख्यालयामध्ये संलग्न करण्यात येणार असून दररोज पूर्ण गणवेशामध्ये मुख्यालयात ‘परेड’साठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच, त्यांचा उजळणी प्रशिक्षणवर्गही घेण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, पोलीस कर्मचारी चुकले असतील तरी त्यांना सुधारण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा यामागे उद्देश आहे. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते. त्यामुळे त्यांचा उजळणी प्रशिक्षण वर्ग घेतला जाणार आहे. यामुळे त्यांच्यामध्ये सुधारणा होईल अशी आशा असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. सर्व वसूलदार आणि वजनदार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासोबतच प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांनी मात्र, या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

बेकायदेशीर धंदेवाल्यांचा करणार ‘पाहुणचार’
लवकरच पोलीस आयुक्तालयामध्ये (Pune Police) सर्व बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांची परेड घेतली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर सराईत गुंडांची पोलीस आयुक्तालयात परेड घेत त्यांना कायद्याच्या चौकटीत राहण्याचे सक्त निर्देश दिले होते. तसेच, त्यांना कोणतेही गैरकृत्य न करण्याची तंबी दिलेली होती. त्यानंतर अमली पदार्थ विक्रेत्यांचीही अशाच प्रकारे ‘परेड’ घेण्यात आली होती. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी आता शहरातील बेकायदेशीर धंदे चालवणारे, या धंद्यांना आश्रय देणाऱ्यांना झटका देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व धंदेवाल्यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांचाही गुंडांचा ‘पाहुणचार’ केला गेला तसाच ‘पाहुणचार’ केला जाणार आहे. तसेच, या बेकायदेशीर धंद्यांना आशीर्वाद देणाऱ्या, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. त्यामुळे ‘धंदेवाईक’ पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हजारांच्या होणार बदल्या
शहरातील एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार बदली देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांच्याकडून बदलीसाठीचे पर्याय मागवण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एका ठिकाणी या कर्मचाऱ्यांना बदली देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. (IPS Amitesh Kumar Pune Times Mirror)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest