संग्रहित छायाचित्र
पुणे : बांधकाम व्यवसायातील भांडणातून झालेल्या वादामधून थेट थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि अरुण गवळी यांच्या नावे धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या विकसनासंदर्भात सुरू असलेल्या वादामधून हा प्रकार घडला आहे. हा प्रकार ४ जुलै २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला.
शिल्पा अतुल झांजले, अतुल रामचंद्र झांजले, रामदास वांजळे, विजय होळकर, कपिल घुले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राकेश किसन साबळे (वय ३९, रा. सिंहगड रोड, किरकटवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. साबळे यांचा विघ्नहर्ता डेव्हलपर्स नावाने कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. सध्या त्यांचे उंड्री येथील अभिषेक सुरेश बामणे व त्याचे नातेवाईक यांच्याकडून कुलमुखत्यार पत्र व विकसन करारनाम्याद्वारे घेतलेल्या जागेवर जॉईट व्हेंचरमध्ये ५० टके भागीदाराने बांधकाम सुरू आहे. मे २०२१ मध्ये अभिषेक बामणे यांच्याकडून घेतलेल्या जागेवर कंन्ट्रक्शनचे काम करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी अभिषेक यांनी त्यांना या जागेबाबत त्यांचा हिरण्य डेव्हलपर्स यांच्यांसोबत जॉईट व्हेंचर करार झालेला होता. तसेच, हे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने हा व्यवहार संपुष्टात आल्याचे सांगितले. तसेच त्याची झेरॉक्स प्रत देखील दिली. हिरण्य डेव्हलपर्सतर्फे कोणी उभे राहिल्यास काय करायचे अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा बामणे यांनी जाहीर नोटीस देऊ असे सांगितले. त्याप्रमाणे २५ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी जाहीर नोटीस दिली. महिनाभर थांबल्यानंतर या नोटीसला कोणीही प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यामुळे फिर्यादीने बामणे यांच्यांशी संपर्क साधून काम करण्याची तयारी दाखविली. तसेच हिरण्य डेव्हलपर्स तर्फे अजय विजय मोहीते यांनी विकसन करारनामा व कुलमुखत्यार करारनाम्यास संमती दिली.
त्याआधारे या जागेवर ग्राऊंड फ्लोअर व पाच मजले कॉलम व स्लॅब, थोडेसे विटबांधकाम असे अर्धवट झालेल्या बांधकामावर काम सुरू केले. या जागेवर काम सुरू केल्यावर जुलै २०२२ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. साधारण फेब्रुवारी २०२४ मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यातून अजय मोहीते पाटील यांनी तक्रारी अर्ज केला असून चौकशीला हजर राहण्याबाबत सांगण्यात आले. त्यावेळी हिरण्य डेव्हलपर्स तर्फे शिल्पा झांजले, अजय विजय मोहीते, अतुल झांजले यांनी अभिषेक बामणे यांच्याविरुद्ध केल्याचा अर्ज केल्याचे समजले. चौकशी झाल्यावर फिर्यादीने सर्व माहिती दिली. तसेच मोहीते यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला. त्यांनी देखील बामणे यांच्यासोबत केलेले करार कॅन्सलेशन व त्यांना झालेल्या नुकसानीबाबत भरपाई मिळणे संदर्भात दावा दाखल केला आहे. हे दावे प्रलंबित असताना शिल्पा झांजले व अतुल झांजले यांचे वादग्रस्त मिळकतीमध्ये जाणेयेणे सुरू होते.
दरम्यान, बावधान येथील इराणी कॅंफे येथे रामदास वांजळे यांनी फोन करुन फिर्यादीला बोलावून घेतले. त्याठिकाणी रामदास वांजळे, कपिल घुले, विजय होळकर, शिल्पा झांजले, अतुल झांजले हे उपस्थित होते. तेथे कपिल घुले याने तुम्ही दाऊदकडे जावा किंवा गवळी कडेजावा तुम्हाला फिरुन आमच्याकडेच यावे लागणार, कॉम्प्रमाईज करा. परत, काही प्रॉब्लेम झाला तर आमच्याकडे यायचे नाही. अशी धमकी दिली. विजय होळकर यांनी फोन करून तुम्ही कायदेशीर सोसायटी केली का? तुम्ही फ्लॅटवर नावे कशी लावली? तुम्ही पाठीमागुन वार केले. आम्ही समोरुन करतो. बामणे, झांजले गेले बाजुला. तुमचा आता आमच्याशी विषय आहे. तुमचे सगळे विषय कंपनी व आम्ही घेतो आणि तुमच्याकडे बघतो, असे म्हणत धमकी दिली. यासदर्भात फिर्यादीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर, जुलै महिन्यात सोसायटीत जाऊन आरोपींनी सोसायटी सदस्यांना धमकावले. त्यांना इथे राहायचे नाही, आताच्या आता बाहेर पडा असे म्हणत पार्किंगमधील नेमप्लेट तोडल्या. तिस-या मजल्यावरच्या दोन फ्लॅटचे स्टिल्थ फ्लोरच्या एका फ्लॅटला लावलेले कुलूप तोडले. सीसीटीव्ही कॅंमेरे तोडले. वायरींग कट केल्या. डिव्हीआर बंद केला. तसेच, अजय मोहीते यांनी वारंवार पैशांची मागणी केली. तसेच, त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या निलेश ज्ञानदेव नागटिळे यांच्या सदनिकेचा बेकायदा ताबा घेऊन आनंद केळकर यांना झांजले, वांजळे, होळकर, बामणे यांनी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जाधव करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.