संग्रहित छायाचित्र
पुणे : मालमत्तेवरुन कुटुंबात सुरू असलेल्या वादातून आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणाचे पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत प्राण वाचवले. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास बी. टी. कवडे रस्त्यावरील निगडेनगरमध्ये घडली. (Pune Police News)
मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला डायल-११२ नंबरवर रात्री दहाच्या सुमारास फोन आला. घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील निगडेनगर येथील लेन क्रमांक सातमध्ये राहणारे विजय भाऊ पासलकर (वय ३६) हे आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळाली. पासलकर यांनीच नियंत्रण कक्षाला हा कॉल दिला होता. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून तातडीने मुंढवा पोलीस ठाण्याच्या घोरपडी पोलीस चौकीच्या बीट मार्शल ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी प्रवीण होळकर आणि जगदीश महानवर यांना ही माहिती कळवण्यात आली. (Latest News Pune)
होळकर आणि महानवर यांनी तात्काळ निगडेनगरमध्ये धाव घेतली. आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या विजय पासलकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना घोरपडी पोलीस चौकीमध्ये आणण्यात आले. सहायक पोलीस फौजदार रासकर यांनी त्यांना भावनिक आधार दिला. आत्महत्येचे कारण विचारून घेत त्यांची समजूत काढण्यास सुरुवात केली. त्यांना धीर दिला. त्यावेळी पासलकर यांनी मालमत्तेवरुन कुटुंबात वाद सुरू असून त्यामुळे खूप मानसिक त्रास होत असल्यामुळे आत्महत्या करण्यास जात असल्याचे सांगितले. दारम्यान, वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी पासलकर यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला. त्यांना पोलीस चौकीमध्ये बोलावून घेतले. त्यांच्यामधील वाद-विवादाच्या अनुषंगाने चर्चा करुन पासलकर यांच्या तक्रारीचे निरसन करण्याच्या सूचना दिल्या. आत्महत्या करण्यास निघालेल्या पासलकर यांचे समाधान झाले. त्यांच्याकडून आत्महत्या करणार नसल्याचा जबाब स्वःखुशीने लिहून घेण्यात आला. पोलिसांनी दाखविलेली तत्परता व घडवलेले माणुसकीचे दर्शन यामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतूक केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.