संग्रहित छायाचित्र
पुण्यातील प्रतिष्ठित डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) अंतर्गत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म ॲॅण्ड टेलिव्हिजनमधील प्राध्यापक महिलेचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने दोन प्राध्यापकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली असली तरी याबाबत कडक कारवाई करणे टाळले आहे. पुणे पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेतली नाही.
माजी पत्रकार असलेल्या ४१ वर्षीय प्राध्यापक महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘‘मी एप्रिल २०११ ते ३१ मे २०२३ पर्यंत डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) या संस्थेत काम करत होते. संस्थेची ‘ज्ञानयज्ञ’ ही फिल्म करत असताना संस्थेतील तत्कालीन कौन्सिल मेंबर प्रशांत गोखले यांच्याशी माझी ओळख झाली. गोखले हे डीईएस संस्थेचे संचालक गिरीश केमकर यांच्याशी आधीपासून परिचित होते.
साधारण पाच वर्षांपूर्वी डीईएस संस्थेच्या जगन्नाथ राठी व्यावसायिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (जेआरव्हीजीटीआय) संचालकपदी गोखले यांची नियुक्ती झाली. संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गोखले यांच्या मनात माझ्याविषयी असलेल्या वैयक्तिक आकसापोटी त्यांनी मला संस्थेतून काढून टाकण्याची धमकी फोनवर दिली. ‘तुम्हा दोघांना (मी आणि गिरीश केमकर) मी संस्थेतून हाकलून देणार आहे. तुमच्यावर तर आता मी फुलीच मारलेली आहे,’ या भाषेत त्यांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली.’’
कोविडची आपत्ती असलेला तो काळ होता. माझी मुलगी त्यावेळी खूप लहान होती. तसेच घरातील इतर सदस्यांच्या आरोग्याच्या गंभीर समस्यांमुळे मी त्यावेळी शांत राहिले. त्या दरम्यान बीएमसीसीत माझी आणि गिरीश केमकर यांची डीईएसचे तत्कालीन अध्यक्ष शरद कुंटे यांनी नियुक्ती करण्याचे ठरवले. हे समजताच तेथे मला नियुक्त करू नये, असे कुंटे यांना सुचवून गोखले सुडाच्या भावनेने अधिकच पेटले आणि आम्हाला तेथून काढून टाकण्याचा चंग त्यांनी बांधला. गोखले यांनी बीएमसीसीचे उपप्राचार्य आशिष पुराणिक यांच्या मदतीने मला आणि गिरीश केमकर यांना त्रास द्यायला सुरुवात केली. हे लक्षात आल्यावर कुंटे यांनी गोखले यांना समज दिली. यामुळे अपमानित झालेल्या गोखले यांची बदला घ्यायची भावना अधिकाधिक तीव्र झाली. केमकर यांच्याबद्दल वैयक्तिक व्यावसायिक असूया असल्याकारणाने गोखले मला वारंवार केमकर यांच्या बँकेचे तपशील, प्रॉपर्टी डिटेल्स, आर्थिक व्यवहार याबद्दल सातत्याने विचारत होते. मी याबद्दल कुठलीही माहिती देत नाही म्हटल्यावर गोखले यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली. ते स्वतः आणि पत्नीच्या मदतीने फोन करून मला सातत्याने धमकावत होते. केमकर यांच्याविरुद्ध प्लान करायला घरी बोलावत राहिले. मी कोणत्याही प्रकारे दाद देत नाही म्हटल्यावर गोखले माझ्यावर भडकले. माझ्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला माझी वैयक्तिक माहिती विचारणे सुरू केले. माझ्या घरी कोणी येते-जाते? मी भाजी काय केली? माझ्याकडे राहायला कोणी आले होते का, इथपर्यंतचे गोपनीय प्रश्न आणि डिटेल्स गोखले आणि त्यांच्या पत्नी प्राची गोखले हे दोघेही विचारून मला भंडावून सोडू लागले. त्यांनी माझे जगणे असह्य केले, असा आरोप पीडित प्राध्यापिकेने आपल्या तक्रारीत केला आहे.
कुंटे यांनी गोखले यांना गिरीश केमकर यांच्या कामात ढवळाढवळ करू नये, असे सांगितल्यावर गोखले यांनी ‘केमकरची कशी वाट लावतो, ते बघ. फार कुंटे-कुंटे करते ना. संपवतो आता सगळं,’ असं म्हणून मला दम दिला. त्यानंतर मी प्रशांत गोखले यांचा एकही फोन घेतला नाही. त्यांचे एकूणच वागणे, बोलणे, माझ्याकडे पाहणे, मीच नाही तर आजूबाजूच्या हुशार सुंदर स्त्रिया यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा मला लक्षात यायला लागला होता. कुठल्याही स्त्रीने मी म्हणेल तसेच वागले पाहिजे आणि मी म्हणेल तसेच केले पाहिजे, ही त्यांची वृत्ती मला एवढ्या वर्षांच्या परिचयात जाणवली होती. प्रशांत गोखले यांचा पुरुषी दृष्टिकोन हा हीन दर्जाचा आहे, हे मला लक्षात यायला वेळ लागला. मी गोखले यांचे फोन घेतच नाही म्हटल्यावर ते त्यांच्या पत्नीच्या फोनवरून काॅल करून मला दमबाजी करायचे, असे पीडितेने सांगितले.
अंतर्गत तक्रार निवारण समितीसमोरही वापरली आक्षेपार्ह भाषा
२०२३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात गोखले यांनी त्यांचे मित्र योगेश सोमण, बी. व्होक डिपार्टमेंटमधील दोन विद्यार्थिनी यांच्या मदतीने माझ्याविषयी डीईएसचे तत्कालीन अध्यक्ष शरद कुंटे यांच्याकडे बदनामी करत अनेक खोट्या तक्रारी केल्या. गिरीश केमकर आणि माझ्या नात्याबद्दल खालच्या पातळीला जाऊन आमचे चारित्र्यहनन केले आणि त्याआधारे कुंटे यांना आम्हाला संस्थेबाहेर काढण्यास प्रवृत्त केले. बीएमसीसीचे उपप्राचार्य आशिष पुराणिक यांनी या सगळ्यात माझी वैषयिक छळवणूक करत प्रशांत गोखले यांची या गुन्ह्यामध्ये पुरेपूर साथ दिली आणि हे कटकारस्थान रचले. माझ्यावरील सर्व आरोप लिखित स्वरूपात आशिष पुराणिक यांनी आयसीसी म्हणजेच अंतर्गत तक्रार समितीसमोर दाखल केले.
प्रशांत गोखले हे पुराणिक यांच्या विनंतीवरून त्यांच्या बाजूने अंतर्गत तक्रार समितीसमोर माझ्याविरुद्ध साक्ष द्यायला आले. अंतर्गत तक्रार निवारण समितीसमोर सर्व महिलांसमक्ष माझ्याविषयी अतिशय गलिच्छ आरोप करत प्रशांत गोखले यांनी माझ्याविषयी सांगायला सुरुवात केली. त्यातील काही मुद्दे असे होते की, मला आई-वडील नसल्याने मी अनाथ आहे त्यामुळे मी चारित्र्यहीन आहे. माझ्या मुलीचा जन्म माझे पती अमेरिकेत असताना झालेला आहे. त्यामुळे तिचे पितृत्व हे संशयास्पद आहे. गिरीश केमकर आणि माझ्या नात्याविषयी अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन गोखले या साक्षीत बोलले आहेत. ‘तिचे आई-वडील जिवंत नाहीत. पण केमकर तिच्या पाठीशी समाजात भक्कमपणे उभे आहेत, म्हणून मला ती अव्हेलेबल नाही,’ असे गलिच्छ उद्गारही प्रशांत गोखले यांनी काही लोकांकडे काढले आहेत. संस्थेचे सध्याचे अध्यक्ष प्रमोद रावत यांनी मला पुन्हा नोकरीवर घेण्याची प्रक्रिया सुरू करताच गोखले यांनी पुराणिक, कुंटे, धनंजय कुलकर्णी यांच्या मदतीने , नोकरीवर घेऊ नये यासाठी माझं चारित्र्यहनन करत जोरदार विरोध केला, असेही पीडित प्राध्यापिकेने तक्रारीत नमूद केले आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आरोप फेटाळले
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने हे आरोप खोटे आणि बनावट असल्याचा दावा केला आहे. सदर प्राध्यापिकेचा करार थांबवल्यामुळे हा आरोप करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीनेही (आयसीसी) आपले मत स्पष्ट केले आहे. आम्ही सर्वांना न्याय्य सुनावणी देण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे म्हटले आहे.
डीईएसचे सध्याचे अध्यक्ष प्रमोद रावत म्हणाले, ‘‘दोन्ही आयसीसी समित्यांनी आपला निकाल दिला आहे आणि आम्ही दोन्ही पक्षांना न्याय्य सुनावणीची संधी दिली आहे. समितीने आपला निष्कर्ष दिला आहे आणि अहवालानुसार शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. समितीने असा निष्कर्ष काढला आहे की संस्थेचा याच्याशी काही संबंध नाही. हे दोन व्यक्तींमधील वाद होते आणि कार्यस्थळावरील छळाच्या दाव्याचा काहीही संबंध नाही.
आयसीसी समितीच्या कार्यकारी प्राधिकरणाने निरीक्षण नोंदवले आहे की, या प्रकरणात लैंगिक छळ झाल्याचे दिसत नाही. तथापि, गोखले यांनी जी साक्ष दिली, ती धक्कादायक आणि अपमानजनक आहे. त्यांनी आपली मर्यादा ओलांडली आहे. गोखले यांनी पीडितेवर वैयक्तिक आरोप करण्याची आवश्यकता नव्हती. व्यवस्थापनाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. अभिलेखातून हे सिद्ध होत नाही की, लैंगिक छळाचा कोणताही सूचक संदेश होता किंवा तक्रारीमध्येही त्याचा आरोप करण्यात आलेला नाही. पुरोहित यांच्याविरुद्धदेखील अतिशय गंभीर आणि वैयक्तिक आरोप आहेत. आम्ही व्यवस्थापनाला कायद्याप्रमाणे त्यांच्याविरुद्ध योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्याचे निर्देश देतो.’’
पोलिसांचेदेखील असहकार्य
या महिलेने पुणे शहर पोलिसांच्या भरोसा सेल आणि सायबर सेलशी संपर्क साधला आणि प्रशांत गोखले, बीएमसीसीचे उपप्राचार्य आशिष पुराणिक तसेच बीएमसीसीचे सीडीसी अध्यक्ष रवींद्र आचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीमध्ये (आयसीसी) याबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत उशिरा तक्रार का दाखल केली, याचे कारण सांगताना ही महिला म्हणाली, ‘‘कोविड महामारीच्या संकटादरम्यान माझी मुलगी लहान होती. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांच्या गंभीर आरोग्याच्या समस्यांमुळे मी त्या वेळी शांत राहिले.’’
'ही लढाई माझ्या आणि माझ्यासारखींच्या सन्मानासाठी...'
राजीनामा द्यायला भाग पाडल्याबद्दल पीडितेने विद्यापीठ न्यायाधिकरणात स्वतंत्र खटला दाखल केला आहे आणि हा खटला प्रलंबित आहे. यावर पीडिता म्हणाली, ‘‘कॅम्पसमध्ये १२ वर्षे काम केल्यानंतर अशा गैरप्रकारांमुळे आणि गैरवर्तनामुळे मला राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. अजूनही मी नोकरीसाठी संघर्ष करत आहे. ही लढाई माझ्या सन्मानासाठी आणि माझ्यासारख्या अनेक महिलांसाठी आहे, ज्यांना अशा प्रकारात सामील नसल्यावरही खूप त्रास सहन करावा लागतो. दोन वर्षे लढल्यानंतर एक छोटासा आशेचा किरण दिसत आहे. मी माझे करिअर आणि नोकरी या कालावधीत गमावली आहे. पोलिसांनीही माझी तक्रार नोंदवली नाही. त्यासाठी संघर्ष सुरूच आहे.’’