PUNE: उच्च शिक्षित मोबाईल चोरटा गजाआड
पुणे : तब्बल १७ मोबाईल चोरून त्यांची विक्री करण्यासाठी नामांकित कंपनीच्या बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हप्त्यावर विकत घेतलेल्या मोबाईलचे हप्ते भरण्यासाठी आणि 'गर्लफ्रेंड'ला फिरवण्यासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी मोबाईल चोरीचा गोरखधंदा त्याने सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे. (Pune Crime News)
विनोद ओंकार बत्तुल (वय २२, रा. नाना पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे बीएससी पर्यन्त शिक्षण झालेले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील तोफखाना भागात असलेल्या फर्निचर दुकानात काम करीत असलेल्या एका तरुणाचा मोबाईल ४ जानेवारी रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्या अनुषंगाने चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले. दरम्यान, पोलिसांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भागात सापळा लावत आरोपीला ताब्यात घेतले
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या मोबाईल चोरीची कबुली दिली. चोरीचे मोबाईल विकण्याकरिता त्याने केलेली हुशारी पाहून पोलीस चकीत झाले. नामांकीत इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री करणाऱ्या कंपनीच्या मोबाईल विक्रीच्या मुळ बिलाचा त्याने वापर केला. बिलाच्या पीडीएफमध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची नव्याने पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवत विकत होता. त्याने चोरीचे हे मोबाईल मोबाईल दुकानदारांना बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विकले आहेत. त्याने चोरी केलेले एकुण १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मालकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई परीमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गील, सहाय्यक आयुक्त वसंत कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.
विनोद बत्तुल हा बीएससीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी विजय सेल्स शोरूममधून मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल हप्त्यांवर खरेदी केली होता. मात्र, काही दिवसांनी त्याला हप्ते भरणे अवघड जाऊ लागले. त्याला एक 'गर्लफ्रेंड' देखील आहे. तिच्यावरील खर्च देखील त्याला शक्य होत नव्हता. त्यामुळे त्याने मोबाईल चोरी करून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.