संग्रहित छायाचित्र
पुणे: गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने भवानी पेठेमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा पकडला. याठिकाणी छापा टाकत पोलिसांनी तब्बल १४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
कामरान मुर्तूजा खान (वय २८), अमन मोहंमद इस्लामुद्दीन (वय ३१, दोघे सध्या रा. भवानी पेठ, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भवानी पेठेतील लक्ष्मीनारायण सोसायटीत बेकायदा गुटख्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आपापल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार व टोळी सदस्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. युनिट १चे अधिकारी व अंमलदार हेदेखील त्यांच्या हद्दीत गस्त घालत होते. वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद व अंमलदार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची तपासणी करीत असताना खबऱ्यामार्फत आरोपींची माहिती मिळाली. भवानी पेठेतील लक्ष्मी नारायण सोसायटीत प्रतिबंधीत गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अमलदार महेश बामगुडे, आण्णा माने, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश जाधव, अय्याज दड्डीकर, अनिकेत बाबर, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शुभम देसाई, प्रफुल्ल शेलार यांनी छापा टाकला. याठिकाणी खानच्या ताब्यातून ७ लाख ४७ हजारांचा तसेच अमन इस्लामुद्दीन याच्या ताब्यातून टेम्पोमधून ६ लाख ५३ हजार ४०० रुपये असा एकूण १४ लाख ५८० रुपयांचा विमल पान मसाला, आरएमडी माणिकचंद, राजनिवास पान मसाला, रजनीगंधा पान मसाल, तुलसी पान मसाला असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३ (१) व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.