Pune Crime News: ‘आयटी’ ट्रेनिंग सेंटरमध्ये तरुणीला तोकडे कपडे घालण्याची सक्ती

पुणे : कोथरूड परिसरातील एका आयटी ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या समुपदेशक महिलेला तोकडे कपडे घालण्याची सक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासोबतच तिच्या शरीराच्या ठेवणीवरुन देखील अश्लील शेरेबाजी करून विनयभंग करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : कोथरूड परिसरातील एका आयटी ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या समुपदेशक महिलेला तोकडे कपडे घालण्याची सक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासोबतच तिच्या शरीराच्या ठेवणीवरुन देखील अश्लील शेरेबाजी करून विनयभंग करण्यात आला. ही घटना ८ मे २०२४ ते १४ मे २०२४ या कालावधीत घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) सेंटरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

महेश गंगाधर कनेरी (रा. लोटस लक्ष्मी, विकासनगर, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भादवि ३५४ (अ), ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय पिडीत महिलेचे फिर्याद दिली आहे. कोथरूड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेश कनेरी हा कोथरूड गावठाणात असलेल्या बालाजी कॉम्प्लेक्समध्ये ‘गामाका ए आयआयटी’ ट्रेनिंग सेंटर चालवतो. या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कोर्सेस शिकवले जातात. या सेंटरमध्ये पिडीत महिला शैक्षणिक समुपदेशक म्हणून काम करते. ती नुकतीच या ठिकाणी नोकरीस लागली आहे. 

आरोपी कनेरी याने या महिलेला एकटे गाठले. तिला, ‘तु अशा कपड्यांमध्ये का आली आहेस? अशी विचारणा करीत या संस्थेत कामावर येताना डिपनेक आणि शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते हे माहिती नाही का अशी विचारणा केली. वास्तविक या सेंटरमध्ये तसा कोणताही ड्रेस कोड नसताना देखील या महिलेला तोकडे कपडे घालण्यासाठी सक्ती करण्यात आली. तसेच, तिला तिच्या शरीरावरून शेरेबाजी करीत तिला जीमला जाण्याचा सल्ला दिला. तसेच, तिला बिझनेस मिटींगसाठी हॉटेलमध्ये येण्याबाबत विचारणा केली. दुसऱ्या मुली माझ्यासोबत येत असतात असे सांगत तिला पैशांची काही कमी पडणार नाही असे म्हणत पैशांचे आमिष दाखवले. तिच्याशी अश्लील संवाद साधत विनयभंग केला. 

याबाबत कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदेश देशमाने म्हणाले, की पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. आरोपीला सीरीआरपीसी कलम ४१ नुसार चौकशी आणि तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest