Pune Crime News: पोटच्या मुलीवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून खून

पुणे : कौटुंबिक वादामधून पोटच्या अल्पवयीन मुलीवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करीत वडिलांनीच प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी

Pune News

Pune Crime News: पोटच्या मुलीवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून खून

हल्लेखोर बापाला लोणीकंद पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : कौटुंबिक वादामधून पोटच्या अल्पवयीन मुलीवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करीत वडिलांनीच प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाघोली (Wagholi) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. (Pune Crime News)

अक्षदा फकिरा दुपारगुडे (वय १५, रा. प्राथमिक उपचार केंद्राजवळ, वाघोली) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचा वडील फकिरा गुंडा दुपारगुडे (वय ४५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फकिरा हा बांधकाम साईट्सवर सेंटरिंग लेबर म्हणून काम करतो. तर त्याची जुळगी अक्षदा ही इयत्ता दहावीत शिकते. तिची आई धुण्या भांडयाची कामे करते. तिला एक भाऊ देखील आहे.  हे कुटूंब मुळचे धाराशीव जिल्ह्यातील आहे. हे सर्वजण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळच राहण्यास आहे. बुधवारी सकाळी घरामध्ये अक्षदा आणि तिचे वडील असे दोघेच होते. तिची आई धुण्याभांड्यांच्या कामासाठी गेलेली होती.

आरोपी फकिरा याला दारू पिण्याचे व्यसन आहे. मागील काही दिवसांपासून तो कामधंदा करीत नव्हता. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात होता. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहामधून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या दारू पिण्याच्या व्यसनावरुन अक्षदा, तिची आई आणि भाऊ फकिरा याच्यासोबत सतत वाद घालत होते. त्याला अनेकदा या तिघांनी मारहाण देखील केलेली होती. बुधवारी सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले.

चिडलेल्या आरोपीने काही कळायच्या आतच तिच्यावर उस तोडण्याच्या कोयत्याने वार करायला सुरुवात केली. तिच्या डोक्यावर, हातावर व पायावर आरोपीने वार केले. तिचा आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक मदतीला धावले. या घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत जखमी मुलीला रुग्णालयात हलवले. हा हल्ला कशासाठी करण्यात आला याबाबत तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ काईंगडे यांनी सांगितले.

दरम्यान, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर, आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर येथील गाडीतळ येथून ताब्यात घेतले. खुनाची घटना झाल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्या वर्णनावरून शोध सुरू करण्यात आला होता. त्यावेळी आरोपी गाडीतळ परिसरात असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest