PUNE CRIME NEWS: 'शरद मोहोळ'च्या खुनाप्रकरणी दोन वकिलांसह आठजणांना अटक

पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरसह आठ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करुन शिरवळजवळ शुक्रवारी रात्री उशिरा जेरबंद केले. त्यांच्याकडून

संग्रहित छायाचित्र

गुन्हे शाखेने खेड शिवापूरजवळ केली अटक: भुगाव येथील जमिनीच्या व्यवहाराचे प्रकरण

पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरसह आठ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करुन शिरवळजवळ शुक्रवारी रात्री उशिरा जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन पिस्तूलं जप्त करण्यात आली आहेत. मोहोळच्या खुनासाठी वापरलेल्या पिस्तूलाचा यात समावेश आहे. यासोबतच आरोपीनी गुन्हा करताना वापरलेल्या दोन दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या सात जणांमध्ये नामदेव कानगुडे ऊर्फ मामा याचा समावेश असून त्याचे मोहोळशी जमिनीवरुन आणि आर्थिक गोष्टीवरुन वाद झाले होते. यामधून मोहोळ याला मारण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे. (Pune Crime News)

शरद हिरामण मोहोळ (वय ३९, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) असे खून झालेल्याचे पूर्ण नाव आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७, सुतरदरा, कोथरूड), अमित मारुती कानगुडे (वय २४, रा. लेन नं. ९५, स्वराज मित्र मंडळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. लेन ९४, शंकर मंदिर, जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. शांतनू कॉम्प्लेक्स, अजय वाइन शॉप, पौड रोड), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. शिताई लेक ए विंग, फ्लॅट न. ३०१, भूगाव, ता. मुळशी), विठ्ठल किसन गांडले (वय ३४, रा. शिवकल्याण नगर, सुतारदरा, कोथरूड), एड. रवींद्र पवार आणि एड. संजय उडाण अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अरुण ध्रुपद धुमाळ (वय ३२, रा. दत्त मंदिराजवळ, जय भवानी नगर, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. 

परीमंडल तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तो पोळेकर, अमित कानगुडे, फिर्यादी धुमाळ आणि प्रमोद साठे असे दुपारी दीडच्या सुमारास दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. पाठीमागून चालत असलेल्या पोळेकर याने मोहोळ याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने देखील त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार मोहोळ याच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या येवले चाळीजवळ घडला. नामदेव कानगुडे आणि मोहोळ यांच्यामध्ये भूगावमधील एका जमिनीवरून वाद सुरू होते. पोळेकर आणि अन्य काहीजण कानगुडे याच्यासाठी काम करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कानगुडे याने कट आखून त्यांना ठरवून मोहोळच्या टोळीत घुसवले. महिन्याभरापासून पोळेकर आणि अन्य काहीजण मोहोळच्या टोळीत सहभागी झाले होते. त्यांनी ठरवून मोहोळचा गेम केल्याचे बोलले जात आहे. पोलीस गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व शक्यता पडताळून पहात आहेत.  

चालत जात असलेल्या मोहोळच्या पाठीमागे जाऊन सोबत आणलेल्या पिस्तूलामधून आरोपींनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आतच त्याने एकामागे एक अशा चार गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या मोहोळच्या शरीरात घुसल्या. त्याच्या साथीदारांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. पोळेकर आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान त्याला धुमाळ यांनी सह्याद्री रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest