टेलिग्राम अँपद्वारे दोघांना सव्वा कोटींचा गंडा
पुणे : मागील काही महिन्यांमध्ये टेलिग्रामद्वारे (Cyber police) विविध टास्क देण्याच्या नावाखाली ऑनलाइन फ्रॉड करीत (Telegram app) लाखो रुपयांची फसवणूक (Fraud) केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर पोलिसांनी अशाच प्रकारचे दोन गुन्हे (Pune News) दाखल केले आहेत. यूट्यूब चैनलला सबस्क्राईब आणि लाईक करण्याचे टास्क देण्याच्या बहाण्याने एकाला ४९ लाख रुपयांना गंडवण्यात आले. तर, दुसऱ्या एका व्यक्तीला ७० लाख रुपयांना फसवण्यात आले आहे. हे दोन्ही गुन्हे सायबर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत.
शूलभ नांगर (वय ३४, रा. मयूर किलबिल सोसायटी, धानोरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी टेलिग्राम आयडी धारकांनी शुलभ नांगर यांच्याशी त्यांच्या व्हाट्सअप वर संपर्क साधला. त्यांना ऑनलाइन टास्क चे काम असल्याची बतावणी केली. यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब आणि लाईक करण्याचे टास्क देऊन भरपूर कमिशन दिले जाईल अशी बतावणी केली. हे काम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना १३५० रुपये कमिशन स्वरूपात देण्यात आले. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून विविध खात्यांवर ४९ लाख ६८ हजार १७५ रुपये भरायला लावून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करीत आहेत.
तर मुफ्फदल मोहम्मद मामा (वय ४८, रा. कोणार्क इंद्रयू इन्क्लेव्ह, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. मुफ्फदल मामा यांना आरोपींनी व्हाट्सअप व ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना देखील ऑनलाइन टास्क जॉबच्या माध्यमातून भरपूर परतावा आणि पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात आले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना वेळोवेळी वेगवेगळे टास्क दिले. त्यांना सुरुवातीला काही कमिशन देण्यात आले. त्यानंतर विविध चार्जेसच्या नावाखाली एकूण ७० लाख ३२ हजार २७९ रुपये वेगवेगळ्या खात्यांवर पाठवायला सांगून आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.