संग्रहित छायाचित्र
पुणे : अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होत असतानाच वारज्यातील सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या दहा ते बारा तरुणांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यासोबतच या ठिकाणी पार्क केलेली कार फोडून दगडफेक केल्याचा प्रकार देखील यावेळी घडला. ही घटना वारजे (Warje) येथील रामनगर परिसरात असलेल्या एकता सोसायटीमध्ये २२ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. (Latest News Pune)
वारजे पोलिसांनी (Warje Police) याप्रकरणी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैभव गावडी, प्रकाश राठोड, महादेव झाडे, साहिल शेख यांच्यासह आठ ते दहा अनोळखी तरुणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सौरभ ज्ञानोबा चौधरी (वय २४, रा. एकता सोसायटी, रामनगर, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. सौरभ चौधरी यांचा मित्र विजय सापरिया यांनी सोसायटीमध्ये रामोत्सवाचे आयोजन केलेले होते. सापरिया यांनी त्याचा मित्र वैभव गावडी याला कार्यक्रमासाठी बोलवले होते. गावडी हा त्याच्यासोबत बाहेरचे मित्र घेऊन त्या ठिकाणी आला. (Pune Crime News)
कार्यक्रम सुरू असताना फिर्यादी सौरभ याचा मित्र निरंजन माळी याला काहीही कारण नसताना वैभव गावडी याने हाताने मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या अन्य मित्रांनी त्याला शिवीगाळ केली. यावेळी सौरभ चौधरी आणि त्यांचा मित्र अभिषेक डोंगरदिवे हे भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने सौरभ याला 'तुम्ही आमच्या भांडणात पडू नका. नाहीतर तुम्हाला सोडणार नाही' अशी धमकी दिली. फिर्यादीने भांडणे सोडवल्याच्या रागामधून आरोपींनी फिर्यादीच्या घराबाहेर लावलेली चार चाकी गाडी फोडली. तसेच, दगडफेक करून जीवितास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.