संग्रहित छायाचित्र
पुणे : 'कमांड हॉस्पिटल'मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत नऊ जणांकडून लाखो रुपये उकळत आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२३ या कालावधी दरम्यान कमांड हॉस्पिटल पुणे आणि लुल्ला नगर येथे घडला. (Pune Crime News)
विनायक कडाले आणि त्याची पत्नी दिपाली कडाले (रा. गंगाधाम, लुल्ला नगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिषा साहिल खान (रा. कुलउत्सव सोसायटी, खडीमशीन, कोंढवा बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी महिलेसोबत ओळख करून घेतली. त्यांना कमांड हॉस्पिटलमध्ये भरती चालू असल्याचे सांगितले. कमांड हॉस्पिटल मधील कमांडंट आपल्या चांगल्या ओळखीचे आहेत, असे सांगून त्यांच्या नातेवाईकांना आणि परिचयाच्या लोकांना भरती करून देतो असे अशी बतावणी केली. (Latest News Pune)
प्रत्येकी तीन लाख रुपये लागतील असे सांगत आठ जणांचे १३ लाख ५० हजार रुपये त्यांच्याकडून रोख व बँक ट्रान्सफरद्वारे उकळले. बरेच दिवस झाले तरी भारती प्रक्रिया अथवा पुढील कोणतीही कार्यवाही होत नसल्याने फिर्यादी यांनी आरोपीकडे विचारणा सुरू केली. मात्र, त्याने थातुरमातुर कारणे देण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याने घेतलेल्या रकमेपैकी अडीच लाख रुपये परत केले. उर्वरित रकमेचा कोरा चेक त्यांना दिला. आरोपीने फिर्यादीच्या ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना नोकरी न लावता तसेच त्यांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.