आरोपी कृष्णा बाबुराव सावंत
पुणे: खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या गुन्हेगाराने भर रस्त्यावर एका तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीने विरोध करताच तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या डोक्यात कोणत्यातरी कठीण वस्तूने घाव घालण्यात आला. त्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून डोक्यामध्ये दोन टाके पडले आहेत. ही घटना स्वारगेट येथील बस थांब्यावर १ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. स्वारगेट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कृष्णा बाबुराव सावंत (वय २५, रा. वांजरखेडा, निलंगा, लातूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता ७४, ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २१ वर्षीय पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.
स्वारगेट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सावंत याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तर, खेड पोलीस ठाण्यात देखील गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात बंद होता. त्याची काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटका झालेली आहे. तो न्यायालयात असलेल्या सुनावणीच्या तारखेसाठी पुण्यात आलेला होता. तर, पिडीत तरुणी मुळची कोल्हापूरची आहे. आयटी इंजिनियर असून पुण्यात एका खासगी कंपनीत प्रशिक्षणार्थी अभियंता (इंटर्नशीप) म्हणून काम करीत आहे. ही तरुणी सध्या कोंढवा भागात राहण्यास आहे. ही तरुणी आणि तिची मैत्रीण लष्कर भागात खरेदीकरिता गेल्या होत्या. खरेदी करून झाल्यानंतर या दोघी घरी जात असताना स्वारगेट येथील कात्रजकडे जाणाऱ्या बस थांब्याजवळून जात होत्या. त्यावेळी आरोपी सावंत याने पिडीत तरुणीचा हात धरला. तसेच, तिला स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने त्याच्यापासून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने तिचा हात अधिक घट्ट पडकून ठेवला. त्यावेळी फिर्यादीने स्वत:च्या बचावासाठी आरोपीच्या गालावर चापट मारली. तेव्हा आरोपीने पुन्हा तिचा हात पकडून तिला स्वत:च्या अंगावर ओढले. तसेच, तिच्याशी अश्लील कृत्य केले. त्यावेळी फिर्यादीची मैत्रीण दर्शना हीने फिर्यादीला आरोपीच्या तावडीमधून सोडवण्याचा प्रयत्न केला. तिची सुटका करून या दोघी कात्रजकडे जाणाऱ्या मार्गावरील बसथांब्यावर जायला निघाल्या. त्यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन या तरुणीच्या डोक्यात कठीण वस्तूने जोरदार प्रहार करून तिला जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नागरिक आणि या तरुणींनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक पुनम पाटील करीत आहेत.