दोन कोटीच्या फसवणूक प्रकरणात महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे : लॉकडाऊन (Lockdown) काळात बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवण्यास कोणी (Pune Crime News) तयार नसल्याने एका बांधकाम वव्यावसायिकाने एकाला इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायातून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ३० लाखा ४५ हजारांची फसवणूक (Fraud) प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निर्णय दिला आहे. रोया ऊर्फ सीमा नादीर नईमा आबादी (Roya alias Seema Nadir Naima Abadi) (वय ३५, रा. कॅम्प) असे जामीन फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), सीमा उर्फ रोया नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन १९९९ चे कलम ३ चा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत रास्तापेठ येथे घडला. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. लॉकडाऊन काळात बांधकाम व्यावसायामध्ये मंदी असल्यामुळे नादीर व मौलाना शोएब यांना पैशांची गरज होती. त्या काळात कोणीही बांधकाम व्यवसायामध्ये पैश्यांची गुंतवणुक करत नव्हते. त्यामुळे आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती.
विशेष न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हा अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी झाली. गुंतवणुकदारांचे वकील ॲड. अमेय सिरसीकर यांनी युक्तीवाद केला की, अर्जदार आरोपी ही मुख्य आरोपीची पत्नी असल्यामुळे तिला पतीच्या सर्व आर्थिक गैरव्यवहाराबद्दल पूर्णपणे माहिती होती. या गुन्ह्यातल्या आर्थिक गैरव्यवहाराची ती सुद्धा लाभार्थी आहे. तिने गुंतवणूकदारांना तिच्या पतीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याकरिता उद्युक्त केल्यामुळे तिचा देखील सुरुवातीपासून गुंतवणूकदारांना फसविण्याचा उद्देश होता. आरोपीचे म्हणणे नकारार्थी होते. या गुन्ह्यातील कथित फसवणुकीची रक्कम. गंभीर स्वरूपाचा विचार करून आरोपीची कोठडीत चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. या प्रकरणात सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर, ॲड अमेय सिरसीकर, ॲड. महेश झंवर, ॲड. श्रीकृष्ण घुगे, ॲड. गणेश गोरावडे, ॲड. प्रसाद रेणुसे यांनी काम पाहिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.