संग्रहित छायाचित्र
अलीकडच्या काळात बेकायदा धंदे बंद झाल्यानंतर पोलिसांनी व्यावसायिकांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी असतानादेखील पोलिसांनी एका हॉटेल मालकाला सव्वाअकरा वाजताच हॉटेल बंद करण्यासाठी दमदाटी करीत मारहाण केल्याची घटना घडली.
एवढेच नव्हे तर पोलिसांकडून हॉटेलच्या साहित्याची तोडफोड करण्यात आली. शहरात गुन्हेगारी फोफावत असताना त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी पोलीस व्यावसायिकांना त्रास देऊ लागल्याने संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून कारवाईची मागणी केली जात आहे.
ज्ञानेश्वर पादुका चौकात ‘द खालसा जंक्शन’ या हॉटेलमध्ये ८ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. हॉटेल मालक हॉटेल बंद करण्याच्या तयारीत असताना रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी चार तरुणी एका टेबलवर आईस्क्रीम खात बसल्या होत्या. अन्य एक तरुण पार्सल घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. तेवढ्यात चतुःश्रुंगी पोलिसांच्या तीन गाड्यांचा ताफा घटनास्थळी आला. हॉटेलचे गेट बाहेरून बंद होते. पांढरा शर्ट घातलेले पोलीस कर्मचारी आतमध्ये आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यामुळे तरुणी घाबरल्या. पोलिसांनी गल्ल्यावर बसलेल्या हॉटेलमालकाला धक्काबुक्की करीत बाहेर काढले. त्यांच्या मानगुटीला पकडून बाहेर ओढत नेले. त्याच्या पाठीत काठी मारण्यात आली. ‘‘तुला समजत नाही का पोलीस आल्यानंतर गाडीत जाऊन बसायचे. घ्या रे याला ताब्यात,’’ असे म्हणून धमकावले. त्यानंतर हॉटेलमधील आचाऱ्याला पकडून मारहाण करत गाडीत बसवण्यात आले. त्याच्या हाताला काठीचा मार लागला.
चौकशीच्या नावाखाली दिला त्रास
पोलिसांनी हॉटेल बंद करू न देता मालक आणि आचाऱ्याला कारवाईची भीती दाखवत सोबत नेले. वडारवाडी चौकीत नेऊन चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. त्यानंतर सेनापती बापट रस्ता, दीप बंगला चौक-वडारवाडी असे फिरवत चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांना बसवून ठेवत नंतर सोडून देण्यात आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.