संग्रहित छायाचित्र
पुणे : पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर आता एनसीबी (NCB Raid )देखील ऍक्टिव्ह झाली असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमध्ये छापेमारी करीत तब्बल २०० किलो अमली पदार्थांचा (drugs) साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिरूर तालुक्यातील एका निर्जन ठिकाणी अमली पदार्थाचा कारखाना चालवला जात होता. अल्प्राझोलम (Alprazolam) नावाचा हा अमली पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपयांना विकला जात असल्याचे समोर आले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे छापे टाकून ही कारवाई केली. ससून रुग्णालयामधून ललित पाटील चालवीत असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर जवळपास सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानंतर एनसीबीने देखील राज्यभरामध्ये कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
मिडगूलवाडीच्या दुर्गम भागात असलेल्या झाडाझुडपांनी वेढलेल्या परिसरामध्ये एक पत्र्याचे शेड टाकण्यात आलेले होते. या ठिकाणी अमली पदार्थांच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू होता असे समोर आले आहे. ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा चौकशी केल्यानंतर देखील या ठिकाणी फिनेल आणि तत्सम पदार्थ तयार करण्याचे काम चालते अशी बतावणी करण्यात आलेली होती. दरम्यान, एनसीबीने शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करीत या ठिकाणी सुरू असलेले रॅकेट समोर आणले.यासोबतच पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील कारवाई मध्ये २६ किलो अल्प्राझोलम जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये संशयित असलेले आरोपी फरार झाले आहेत.
आरोपींनी वडगाव सानी रस्त्यावर असलेल्या एका शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड भाडे करारावर घेऊन त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला होता असे देखील समोर आले आहे. अल्प्राझॉम हे रसायन निद्रानाशावरील औषधात वापरण्यात येते. त्याचा अमली पदार्थ बनवण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे आता समोर आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.