नाना गायकवाडवर पालिकेकडून गुन्हा डबल मोक्कामध्ये सध्या आहे कारागृहात
पुणे : दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या नाना गायकवाड (Nana Gaikwad) याच्या विरोधात महापालिकेमार्फत फसवणुकीचा (Fraud)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीचे बनावट भोगवटा पत्र तयार करून त्याचे स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (State Bank of India) भाडेकरार करून ही फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार १५ डिसेंबर २०२० पासून आज पर्यंत घडला.
नानासाहेब शंकरराव गायकवाड (रा. एनएसजी हाऊस, बाणेर रोड) तसेच भोगोटा प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इमारत निरीक्षक कामिनी सुरेश घोलप (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार सर्वे नंबर १२७/१ ए ते १ इ, प्लॉट नंबर १०८ औंध, या ठिकाणी घडला. कामिनी घोलप या पुणे महानगरपालिकेमध्ये इमारत निरीक्षक म्हणून नोकरी करतात. त्यांच्याकडे बांधकाम व्यवसायिकांना बांधकामाची परवानगी देणे, बांधकाम झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देणे अशा प्रकारची संबंधित कामे आहेत.
नाना गायकवाड याने बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भोगवटा प्रमाणपत्र महापालिकेकडून घेतलेले नव्हते. तरी देखील त्याचा वापर सुरू केला. हा मजला स्टेट बँक ऑफ इंडियाला भाडे करारावर दिला आणि त्याचा करार देखील नोंदवून घेतला. हा भाडेकरार करीत असताना त्याने बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ते करारनाम्यामध्ये जोडले. अशाप्रकारे त्याने शासनाची आणि महानगरपालिकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. नाना गायकवाड याच्यावर यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. यासोबतच जमीन बळकावणे, धमकावणे, खंडणी उकळणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर डबल मोक्का लावण्यात आलेला आहे. त्याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला देखील करण्यात आलेला होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झरेकर करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.