संग्रहित छायाचित्र
गणेश विसर्जन करत असताना मावळ तालुक्यातील बेडसे गावात एक दुर्दैवी घटना घडली. पाण्यात बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 12) सायंकाळी घडली.
संजय धोंडू शिर्के, हर्षद संजय शिर्के (वय 20, दोघे रा. बेडसे, करुंज, ता. मावळ) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, बेडसे गावातील काही नागरिक सहाव्या दिवशी गणेश विसर्जन करतात. गुरुवारी सहाव्या दिवशी गणेश विसर्जन करत असताना संजय शिर्के आणि त्यांचा मुलगा हर्षद शिर्के हे पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ, मावळ आपत्ती व्यवस्थापनचे निलेश गराडे, रमेश कुंभार, शत्रुघ्न रासनकर, ओंकार कालेकर, संतोष दहिभाते, शुभम काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गुरुवारी रात्री दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. एकाच कुटुंबातील दोघांचा करुण अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.