ललित पाटील ससूनमधून पळाल्यानंतर तब्बल महिन्याने आणला पुण्यात
पुणे : ससून ड्रग्ज प्रकरणात 'मोस्ट वॉन्टेड' असलेल्या आरोपी ललित पाटीलचा (lalit Patil) ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे. पुणे पोलिसांनी अंधेरीच्या न्यायालयात दाखल केलेले (Pune Crime News) प्रोड्यूस वॉरंट मान्य करण्यात आले होते. मंगळवारी पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेची पथके त्याला आणण्याकरिता मुंबईला रवाना झाली होती. दुपारी त्याचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाली. त्याच्याकडे आता दोन गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. रात्री उशिरा गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्यात दाखल झाली. त्याच्यासोबत शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी यांचाही ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. यासर्वांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ललित अनिल पाटील (रा. नाशिक) असे त्याचे पूर्ण नाव आहे. ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांनी आवळल्या होत्या. तामिळनाडू येथील चेन्नईमध्ये मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला जेरबंद केले होते. साकीनाका पोलिसांकडे दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करीविषयक गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पसार झालेला ललित तब्बल ३० दिवसांनी पुणे पोलिसांच्या हातात आला आहे. फरार झाल्यानंतर तो पोलिसांना चकवा देत पुण्यामधून गुजरात आणि त्यानंतर कर्नाटकला गेला होता. यापूर्वी पुणे पोलिसांनी ससून ड्रग्ज तस्करी प्रकरणात भूषण अनिल पाटील, अभिषेक उल्हास बलकवडे (दोघेही रा. नाशिक), सुभाष जानकी मंडल (वय-२९, रा. देहूरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय-१९, रा. ताडिवाला रस्ता) यांना अटक केली होती. एकूण बारा आरोपींची नावे या प्रकरणात निष्पन्न झाली आहेत. समाधान बाबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, जिशान इक्बाल शेख, राहुल पंडित ऊर्फ, रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), हरीश पंत, इम्रान शेख, गोलू (तिघेही रा. मुंबई) अशी त्यापैकी काही आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दोन आरोपी सध्या मुंबर्इत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटकेत आहेत. जिशान शेख याला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. रोहित चौधरी आणि शिवाजी शिंदे अशी ललित सोबत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे पोलिसांनी ललित पाटील पलायनप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यात ललीतच्या दोन मैत्रीणी प्रज्ञा अरुण कांबळे आणि अर्चना किरण निकम या दोघींना अटक केली होती. यासोबतच, पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय विवेक अर्हाना (वय ५२, रा. १४, डॉ आंबेडकर मार्ग, कॅम्प), अर्हानाचा ड्रायव्हर दत्ता डोके याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ललित आणि भूषण यांना मेफेड्रोन बनविण्याचा फॉर्म्युला शिकवणाऱ्या आरोपी अरविंद लोहारेलाही अटक करण्यात आली होती.
ललित पाटीलप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचे आतापर्यन्त निलंबन करण्यात आले आहे. सहायक निरीक्षक सविता भागवत, पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे, पोलीस अंमलदार विशाल बाबूराव टोपले, स्वप्निल चिंतामण शिंदे, दिगंबर विजय चंदनशिव, हेड कॉन्स्टबल आदेश सिताराम शिवणकर, पोलीस नाईक नाथाराम भारत काळे, पिरप्पा दत्तू बनसोडे, अमित सुरेश जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे
ललित २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पसार झाला. जवळच असलेल्या लेमन ट्री हॉटेलमध्ये तो गेला. इथेच तो अधून मधून राहायचा. त्यानंतर रिक्षाने बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. तिथे दत्ता डोके हा त्याला भेटला. त्याने आणलेल्या कारमध्ये बसून तो पिंपरी चिंचवड येथील रावेतला पोचला. डोके याने त्याला तिथे दहा हजार रुपये दिले. दुसर्या कारमध्ये बसून तो मुंबईला गेला. त्यानंतर तो गुजरातला गेला. तिथून तो कर्नाटकला गेला. त्यानंतर चेन्नई गाठली. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याचा ताबा आता पुणे पोलिसांनी घेतला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.