PUNE CRIME NEWS: शरद मोहोळच्या मर्डरची इनसाईड स्टोरी; साथीदारानेच केला खून

पुणे : कुप्रसिद्ध गुन्हेगार शरद मोहोळ याचा त्याच्याच साथीदाराने बेछूट गोळीबार करीत खून केला. त्याच्यावर सलग चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील तीन गोळ्या मोहोळला लागल्या. त्याला तात्काळ

संग्रहित छायाचित्र

एकामागे एक पाठीमागून झाडल्या चार गोळ्या; जमीन व्यवहारातील आर्थिक वाद ठरला हत्येला कारणीभूत

पुणे : कुप्रसिद्ध गुन्हेगार शरद मोहोळ याचा त्याच्याच साथीदाराने बेछूट गोळीबार करीत खून केला. त्याच्यावर सलग चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील तीन गोळ्या मोहोळला लागल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहोळसोबत झालेल्या वादामधून हल्लेखोर तरुणाच्या थोबाडात मारण्यात आले  होते. त्याचा राग आणि जमिनीचा असलेला वाद यामधून मोहोळचा गेम करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

शरद हिरामण मोहोळ (वय ४०, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) असे खून झालेल्याचे पूर्ण नाव आहे. याप्रकरणी साहिल ऊर्ज मुन्ना पोळेकर (वय ३२, रा. सुतारदरा, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अरुण धुमाळ (रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. परीमंडल तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. तो सुतारदरा येथील घरापासून थोड्या अंतरावर आला. त्यावेळी त्याच्यासोबत अरुण धुमाळ, आरोपी मुन्ना पोळेकर, पोळेकरचे दोन साथीदार सोबत होते. मुन्ना पोळेकर याचे काही दिवसांपूर्वी मोहोळच्या गाडी चालकासोबत वाद झाले होते. त्यावेळी मोहोळने देखील त्याच्याशी वाद घातला होता. मोहोळ आणि पोळेकर यांच्यामध्ये एका जमिनीवरून देखील वाद सुरू झालेले होते. मोहोळने पोळेकरच्या थोबाडीत लगावली होती. या मारहाणीचा राग पोळेकरच्या मनात सलत होता.शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ, धुमाळ आणि पोळेकर सोबत चाललेले होते. त्यावेळी पोळेकर याने आपल्या सोबत आणखी दोन साथीदार आणलेले होते. घराकडे चालत जात असलेल्या मोहोळच्या पाठीमागे जाऊन सोबत आणलेल्या पिस्तूलामधून आरोपीने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आतच त्याने एकामागे एक अशा चार गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या मोहोळच्या शरीरात घुसल्या. या हल्ल्यात मोहोळ जागेवरच खाली कोसळला. त्याच्या शरीरामधून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सूरू झाला होता. घटनास्थळावरुन पोळेकर आणि त्याचे साथीदार पसार झाले. दरम्यान त्याला धुमाळ यांनी सह्याद्री रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मोहोळवर गोळीबार झाल्याची बातमी शहरभरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. शेकडो तरुणांचा जमाव सह्याद्री रुग्णालयासमोर जमा झाला होता.

घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, संदीपसिंह गील, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भीमराव टेळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर, कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावर पोलिसांना चार पुंगळ्या आढळून आल्या आहेत. सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला. ससूनमध्ये देखील शेकडो तरुणांची गर्दी जमा झाली होती. यावेळी घटनास्थळ, सह्याद्री रुग्णालय आणि ससून रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  दरम्यान, पोळेकर याच्यासोबत वाद निर्माण झाला ती कोणत्या भागातील जमीन आहे? त्याने शस्त्रे कोठून आणली? त्याला कोणी कोणी मदत केली? आदी प्रश्न अनुत्तरीत असून त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सुरुवातीला हा खून टोळीयुद्धामधून झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पोलिसांनी प्रतिस्पर्धी गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि गुन्हेगार यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली होती. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आणि मोहोळच्या सोबत असलेल्या तरुणांनी याविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा हल्ला आर्थिक वादामधून झाल्याचे समोर आले. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत.

याबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी 'मिरर'शी बोलताना सांगितले की,  मोहोळचा खून टोळीयुद्धामधून झालेला नाही. आरोपी मुन्ना पोळेकर आणि मोहोळ यांच्यात जमिनीचा व्यवहार होता. त्यामधून निर्माण झालेल्या आर्थिक वादामधून मोहोळवर त्याने हल्ला केला. त्याने केलेल्या गोळीबारात मोहोळचा मृत्यू झाला. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक पदर उलगडले जातील. तूर्तास सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. गुन्हेगारांवर बारीक लक्ष आहे. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

----------

मोहोळ याच्या हत्येच्या तपासात गुन्हे शाखेची ९ तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी - शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून ८ आरोपी, ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ राउंड व २ चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.  मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या /पैशाच्या जुन्या वादातुन  आरोपीनी केला असल्याचे प्रथम दर्शी तपासात निष्पन्न  झाले आहे. घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest