संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करून पसार झालेल्या आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. गुन्हे शाखेने यातील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक झाली आहे. आरोपींकडून आतापर्यंत आठ पिस्तूले, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवम आंदेकर याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला पोलीस संरक्षण दिले आहे.
आरोपींनी ही बेकायदा शस्त्र मध्यप्रदेशातील एका गावामधून आणल्याचे समोर आले आहे. या गावाकडे गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी सांगितले. आंदेकर खून प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश, दीर गणेश यांंना अटक करण्यात आली.
याप्रकरणात कोयते, तसेच पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारेला नुकतीच अटक करण्यात आली होती. पसार झालेले आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणी विरोधी पथकाने रात्री उशीरा अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, राहुल मखरे आणि पथकाने ही कारवाई केली.
आंदेकर खून प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. १ सप्टेंबर रोजी वनराज यांच्यावर नाना पेठेत पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. त्यावेळी शिवम त्यांच्यासोबत होता. हल्लेखोरांनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून तो पळाल्याने त्याचा जीव वाचला. त्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.