संग्रहित छायाचित्र
चाकण-शिक्रापूर रोडवर समोरील दुचाकी अचानक वळल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला, तर सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात २३ जून रोजी दुपारी बारा वाजता कडाचीवाडी येथे घडला. दीपक आबासाहेब वलेकर (वय २०) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
पंढरीनाथ नामदेव कोरडे (वय २०, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे जखमी सहप्रवाशाचे नाव आहे. पंढरीनाथ कोरडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर तुकाराम पाटील (वय ५१, रा. कडाचीवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंढरीनाथ कोरडे आणि त्यांचा मित्र दीपक वलेकर हे त्यांच्या दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. कडाचीवाडी येथे आरोपी अमर पाटील हा दुचाकीवरून जाताना अचानक उजवीकडे वळला. त्यामुळे दीपक वलेकर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान दीपक वलेकर यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.