मृत ज्ञानेश्वर बालाजी मनाळे
पुणे: मित्र- मैत्रिणींसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी खडकवासला धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी निर्णय घेतला होता. त्यानुसार सात मित्र या परिसरात फिरण्यासाठी आले होते. मात्र हा फिरण्याचा शेवटाचा आनंद असेल याची कल्पना देखील त्याला नव्हती. धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येणाऱ्या ठिकाणी सेल्फी काढताना त्याची मैत्रिण पडल्याने तो तिला वाचावयाल गेला पण परत आलाच नाही. अवघ्या १८ व्या वर्षी सात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाने मित्रांची साथ सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune News)
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८ रा. खराडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर हा त्याच्या चार मैत्रीणी आणि दोन मित्र असे मिळून सात जण पानशेत धरणाजवळ खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. पानशेत धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येणाऱ्या ठिकाणी ते फोटो काढण्यासाठी थांबले होते. त्यावेळी काही फोटो काढण्यात आले. यावेळी सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. सेल्फी काढताना ज्ञानेश्वरच्या दोन मैत्रिणी पाण्यात पडल्या. मैत्रिणी पाण्यात पडल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी ज्ञानेश्वर पाण्यात उतरला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील त्या मुलींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु ज्ञानेश्वर पाण्यात उतरल्यानंतर तो दिसलाच नाही. तो पाण्यासोबत वाहत गेला होता. पाण्यात बुडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांनी सांगितले. (Latest News Pune)
दरम्यान ज्ञानेश्वर उतरलेल्या पाण्याच्या ठिकाणी आढळून आला नाही. त्यामुळे याची माहिती तत्काळ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले . त्यानंतर ज्ञानेश्वरचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्याला शोधण्यास जवानांना यश आले. परंतु पाण्यात बुडल्याने ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत वेल्हा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांनी माहिती दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.