संग्रहित छायाचित्र
पुणे : शहरात चंदनचोर (Chandanchor) 'पुष्पा' च्या (Pushpa) टोळ्या सक्रिय झाल्या असून चंदन चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अॅडिशनल चीफ सेक्रेटरी राहिलेल्या लीना मेहेंदळे यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून चोरून नेले. दोन दिवसांपूर्वी विधानभवनासमोर असलेल्या पुराभिलेखागार कार्यालयाच्या आवारातील चंदनाची दोन झाडे कापून त्यांचे बुंधे लंपास करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोथरूडमधील लोकमान्य कॉलनीमधील मेहेंदळे यांच्या बंगल्यामधून चंदनाचे झाड चोरून नेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
कोथरूडमध्ये झालेल्या घटनेप्रकरणी लिना प्रकाश मेहेंदळे (Lina Prakash Mehendle)(वय ७३, रा. भाई बंगला, लोकमान्य कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. लिना या त्यांचे पती, नणंद, सुन आणि दोन नातवंडे यांच्यासह राहण्यास आहेत. सन २०१० मध्ये त्या 'अॅडिशनल चीफ सेक्रेटरी' म्हणुन मंत्रालय मुबंई येथुन सेवानिवृत झाल्या आहेत. त्यांच्या बंगल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यामध्ये चंदनाची चार ते पाच छोटीमोठी झाडे देखील आहेत. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी बंगल्याच्या गेटला नेहमीप्रमाणे कुलुप लावले. कुटुंबातील सर्वजण रात्रीचे जेवण करून झोपी गेले. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उठल्यानंतर त्या नेहमीप्रमाणे बंगल्याचे गेट उघडयासाठी बाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्या बंगल्याच्या गेटजवळ असलेल्या चंदनाच्या झाडाच्या बुंध्याच्या वरील भाग खाली पडलेला दिसला. त्यांनी बंगल्याच्या आवारात फिरून पाहिले असतं बंगल्याचे आवारातील ऑफीसकामासाठी वापरल्या जाणाऱ्या खोलीजवळील दुसऱ्या चंदनाच्या झाडाच्या बुंध्याचा भाग देखील कापून नेल्याचे व शेंडयाचा भाग तिथेच पडलेला असल्याचे त्यांना दिसले.
त्यावेळी बंगल्याच्या आवारातील दोन चंदनाची झाडे कोणीतरी कापून त्याच्या बुंध्याचा जाडसर भाग चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी कोथरूड पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले, लिना मेहेंदळे यांच्या घराच्या आवारातील चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाला सुरुवात करण्यात आला आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदनाची झाडे चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी शासकीय कार्यालये, बंगले यांना लक्ष केले आहे. काही महिन्यांपूर्वी नॅशनल डिफेंस अकडमीच्या आवारातून देखील चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी कोथरुडमधील वुडलँड सोसायटीतील सुरक्षारक्षकाला मारहाण करुन चोरट्यांनी चंदन चोरी केली होती. यासोबतच खडकीतील किर्लोस्कर कंपनीमधून देखील चंदनाची झाडे कापून नेण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेमधून चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून चोरून नेल्याची घटना घडली होती. कर्वेनगर भागातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात देखील अशीच चोरी झाली होती.
मागील वर्षभरात चंदनचोरीचे २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ लाख ६४ हजारांची चंदनाची २३ झाडे आणि १० ओंडके आणि १५ खोड लंपास करण्यात आले आहेत. यातील १ लाख ३ हजारांचे ५ झाडे, एक ओंडका हस्तगत करण्यात आला आहे.