संग्रहित छायाचित्र
चंदननगर-
आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पतीने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
यासोबतच तिला मारहाण देखील केली. तिची सुटका करायला आलेल्या बहिणीचादेखील विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ऑगस्ट २०१० पासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत खराडी येथील आपले घर हाऊसिंग सोसायटीमध्ये घडला. या प्रकरणी ४७ वर्षीय पतीसह ७२ वर्षीय सासरे, ६८ वर्षीय सासू आणि ५० वर्षीय दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मंजूषा मुळूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि फिर्यादी पत्नी या दोघांचे ऑगस्ट २०१० मध्ये लग्न झाले होते. आरोपी पती हा पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये बड्या पदावर काम करतो. पती, सासू-सासरे आणि दीर यांनी लग्नानंतर या महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. घर घेण्यासाठी वडिलांकडून पैसे घेऊन येण्याची सक्ती तिच्यावर करण्यात आली. फिर्यादी महिलेच्या पतीने तिच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घरातील या कौटुंबिक भांडणामुळे फिर्यादी महिलेचे आई-वडील आणि बहीण सासरच्यांना भेटायला आले होते. त्यांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता पतीने त्यांनादेखील शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, फिर्यादी महिलेच्या बहिणीची ओढणी ओढून तिच्या अंगाला अश्लील स्पर्श करीत तिचे कपडे फाडल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.