अखेर 'सुरेखा'च्या खुनाला फुटली वाचा, पर्वती पोलिसांचा संवेदनशील तपास

हातावर 'सुरेखा' गोंदलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह तब्बल तीन वर्षांपूर्वी पर्वती टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पडक्या टाकीजवळ आढळून आला होता. तब्बल साडेतीन वर्ष दडून राहिलेला हा खून पर्वती पोलिसांच्या संवेदनशील तपासामुळे उजेडात आला आहे.

अखेर 'सुरेखा'च्या खुनाला फुटली वाचा, पर्वती पोलिसांचा संवेदनशील तपास

साडेतीन वर्षांनंतर महिलेची आणि आरोपीची ओळख पटविण्यात यश

पुणे : हातावर 'सुरेखा' गोंदलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह तब्बल तीन वर्षांपूर्वी पर्वती टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पडक्या टाकीजवळ आढळून आला होता. तब्बल साडेतीन वर्ष दडून राहिलेला हा खून पर्वती पोलिसांच्या संवेदनशील तपासामुळे उजेडात आला आहे. 'खून लपत नाही' ही उक्ती या कौशल्यपूर्ण तपासामुळे सिद्ध झाली आहे. शेकडो तरुणांकडे चौकशी केल्यानंतर खुन्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. त्यांच्यामधील प्रेम संबंधातील तणावातून आणि तात्कालिक वादामधून हा खून झाल्याचे देखील समोर आले आहे.

सागर दादाहरी साठे (वय २६, रा. सुतारदरा, कोथरुड, मुळ रा. पाटील इस्टेट) असे आरोपीचे नाव आहे. सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६ वर्षे रा. वेताळनगर, शिवापूरवाडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास निखील माने नावाच्या तरुणाने पोलीस ठाण्यात येऊन पर्वती टेकडीच्याबाजूला असलेल्या जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर एका महिलेचे प्रेत पडल्याची माहिती दिली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज अभंग आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन याप्रकरणी केला होता. याप्रकरणी  पोलिसांनी अकस्मात गुन्हा दाखल करून शवविच्छेदन करून घेतले होते. तिचा व्हीसेरा राखून ठेवण्यात आला होता. मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने झाल्याचे घोषित करण्यात आले होते. ही महिला अंदाजे ३० ते ३५ वयाची होटी. तिच्या अंगावर काळ्या रंगाचा ब्लाउज व नारंगी रंगाचा परकर, हातात काचेच्या बांगडया व पायाच्या बोटांमध्ये जोडव्या तसेच डाव्या हातावर सुरेखा असे मराठीत गोंदलेले होते.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर देखील तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहिलेले नव्हते. या गंभीर प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासात फारशी प्रगती होऊ शकलेली नव्हती. मात्र, पर्वती पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून मृत्यूचे कारण काय असावे याबाबतचा अंतिम अहवाल मागवला. तसेच, व्हीसेरा, रक्ताचे नमुने, डीएनए यांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या डोक्यात व छातीवर दगड अथवा तत्सम कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. यापक्ररणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्वत: पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे हे फिर्यादी झाले. महिलेची ओळख पटवणे आणि आरोपींचा शोध घेणे असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर होते.

याबाबत पोलीस निरीक्षक खोमणे म्हणाले, की या गुन्ह्याच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 'मिसिंग' महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष विविध शहरे तसेच ग्रामीण भागाटईल पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन तपासून पाहिले. दरम्यान, राजगड पोलीस ठाण्याच्या खेड शिवापूर पोलीस आऊटपोस्ट येथे या वर्णनाच्या महिलेच्या 'मिसिंग'ची तक्रार दाखल असल्याचे समोर आले. ही तक्रार १२ डिसेंबर २०२० रोजी दाखल करण्यात आलेली होती. पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे व तपास पथकातील अंमलदार यांनी रात्रंदिवस पाठपुरावा सुरू केला. रोहन चव्हाण यांच्याकडे अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व खबऱ्यांच्या सहाय्याने आरोपीचा आणि खुनाच्या कारणांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, सुरेखाच्या फोन कॉल्सचे तपशील पोलिसांनी मोबाईल कंपनीकडून मिळवले. तिचे आरोपी सागर सोबत सतत बोलणे होत असल्याचे समोर आले. त्यानुसार, त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला माहिती देण्यात आढेवेढे घेणाऱ्या आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. तत्कालीन वादातून व पैशासाठी त्याने खून केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest