Pune ISIS Module Case : पुणे इसिस मोड्यूल प्रकरणी आठवा आरोपी अटकेत; एनआयएची कारवाई

पुणे 'इसिस मॉड्युल' (Isis module) प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) (NIA) आठव्या संशयित आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) वाहनचोरी करताना पकडलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) त्याचा समावेश होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Fri, 3 Nov 2023
  • 05:20 pm
Pune ISIS Module Case

पुणे इसिस मोड्यूल प्रकरणी आठवा आरोपी अटकेत

पुणे पोलिसांना गुंगारा देत कोंढव्यामधून झाला होता पसार

पुणे : पुणे 'इसिस मॉड्युल' (Isis module) प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) (NIA) आठव्या संशयित आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) वाहनचोरी करताना पकडलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) त्याचा समावेश होता. कोंढवा येथे घरझडती करिता नेण्यात आल्यानंतर हा दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याला पकडण्यात 'एनआयए'ला यश आले असून त्याने विदेशामधून भारतात चालविल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेत या कारवायांना प्रोत्साहन दिल्याचे 'एनआयए'ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आरोपींनी इसिसचा अजेंडा पुढे नेण्यासाठी देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखल्याचे तपासात पुढे आल्याचे 'एनआयए'ने म्हटले आहे. (Pune ISIS Module Case)

मोहम्मद शाहनवाज शफिउर रहमान आलम (रा. पेलवल रोड, न्यू महमूदा हाऊस, कटकमसंडी, हजारीबाग, झारखंड) असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यात महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३ ) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४) या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांसह शाहनवाजला आर्थिक मदत आणि पुण्यात आसरा दिल्याच्या आरोपाखाली कातिल दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादिर (वय ३२, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर 'टेरर फंडिंग' केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर मॅकॅनिकल इंजिनीअर असलेल्या सीमाब नसरुद्दीन काझी (वय २७, सध्या रा. कोंढवा)  याला त्याच्या रत्नागिरी येथील पंडेरी गावामधून अटक करण्यात आली. त्याने देखील या तीन दहशतवाद्यांना पुण्यामध्ये आसरा देऊन त्यांच्यासाठी 'टेरर फंडिंग' केल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडील तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे झुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, जि. ठाणे) याला मुंबई मध्यवर्ती कारागृहामधून अटक करण्यात आली. मुळचा ठाण्याचा असलेला बडोदावाला आयटी इंजिनियर असून गेली काही वर्ष पुण्यातील एका मोठ्या आयटी कंपनीत तो काम करत होता. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी मोहम्मद शाहनवाज आलमचा थेट संबंध होता. 'एनआयए'च्या तपासात असेही समोर आले आहे, की शाहनवाझने अनेक महत्वपूर्ण ठिकाणांची रेकी केली होती. तसेच गुप्तचर म्हणून गोपनीय माहिती काढण्याचे तसेच अग्निशस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आणि स्फोटक उपकरणे कशी वापरावी (आयईडी) याचे सराव तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात तो सक्रिय होता.

पुणे शहर पोलिसांच्या कोथरूड पोलीस ठाण्यातील कर्मचारी रात्र गस्तीवर असताना १९ सप्टेंबर २०२३ रोजी खान, साकी आणि शाहनवाज यांना पकडण्यात आले होते. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडील कागदपत्रे आणि त्यांनी सांगितलेली माहिती यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कोंढव्यात ते रहात असलेल्या घराची झडती घेतली होती. पुण्यामध्ये त्यावेळी पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून 'अह उल सुफा' या दहशतवादी संघटनेच्या देशविघातक कट कारस्थानांचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणामध्ये पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने एकूण पाच जणांना अटक केली होती. तर शाहनवाज हा फरार झाला होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून ५०० जीबीचा डाटा, धार्मिक आणि कट्टरतावादी साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यातील छाबड हाऊससह काही संवेदनशील ठिकाणांची माहिती, छायाचित्रे, गुगल मॅप आणि स्क्रीन शॉट देखील आढळून आले होते. त्यांच्याकडून टेन्ट जप्त करण्यात आले होते. या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील विविध शहरामध्ये प्रवास केला असून त्यांची पाहणी केल्याचेही समोर आले. कोल्हापूरच्या आंबोली जंगलात ते राहिले होते. पुण्यातील बोपदेव घाट परिसरातील जंगलात त्यांनी स्फोटके पुरून लपवून ठेवलेली होती. येथे त्यांनी बॉम्बची चाचणी देखील केली होती. त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे सर्किट, ड्रोन हे देखील जप्त करण्यात आले होते. दरम्यान, पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या शाहनवाजचा शोध सुरू करण्यात आला होता. पुढे हा तपास एटीएसकडे देण्यात आला होता.

महाराष्ट्र एटीएसने मुंबई मध्यवर्ती कारागृहमधून 'एनआयए'ने अटक केलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला या दहशतवाद्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.  या तपासामध्ये आयसिसचे महाराष्ट्र मोड्युल आणि 'अह-उल-सुफा' यातील समान आरोपी निष्पन्न झाले होते. त्यामुळे हा तपास 'एनआयए'कडे सोपविण्यात आला होता. एनआयएने ३ जुलैला राजस्थानात टाकलेल्या धाडीत बडोदावाला याच्यासह तनीश नासीर सिद्दीकी, जुबेर नुर मोहम्मद शेख आणि शर्जील शेख या तिघांना अटक केली होती. एनआयएने याच प्रकरणात २८ जुलैला डॉ. अदनान अली सरकार याला पुण्यातून अटक केली होती. 'एनआयए'च्या तपासात पुढे हे सर्वजण 'आयएसआयएस'चे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे निष्पन्न झाले. शाहनवाजवर १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest