Crime News: खेड-शिवापूर टोल नाक्यावर १ कोटींचे बेकायदा मद्य जप्त

पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) बेकायदा मद्य वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड (Saswad) पथकाने

Pune News

Crime News: खेड-शिवापूर टोल नाक्यावर १ कोटींचे बेकायदा मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाची कारवाई

पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) बेकायदा मद्य वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड (Saswad) पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह एक कोटींचे बेकायदा मद्य जप्त केले आहे. १ जानेवारी रोजी खेड-शिवापूर (Khed Shivapur) टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकामार्फत गस्त आणि वाहनांची तपासणी केली जात होती. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गोवा राज्यामध्ये निर्मित होणाऱ्या मद्याची बेकायदा विक्री केली जाते. या मद्य तस्करीवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना खबऱ्यामार्फत गोवा राज्यात विक्री करिता असलेल्या मद्याची पुण्यात वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, खेड शिवापुर टोल नाक्यावर सापळा लावण्यात आला. याठिकाणी संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. 

यावेळी एक संशयित दहा चाकी कंटेनर (आरजे ३०,  जीए ३३६२) येताना दिसला. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कंटेनर थांबवला. या वाहन चालकाकडे चौकशी सुरू करण्यात आली. वाहनामध्ये असलेल्या साहित्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये दर्शनी भागात रंगांचे डबे ठेवण्यात आले होते. त्या रंगांच्या डब्यांच्या पाठीमागे एक हजार पेक्षा अधिक मद्याची खोकी आढळून आली. हा मद्य साठा जप्त करण्यात आला. हे मद्य फक्त गोवा राज्यात विक्री करण्याकरिता करता मान्यताप्राप्त आहे. त्याची  वाहनासह अंदाजे किंमत एक कोटी रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

या वाहन चालकाकडे मद्य वाहतुकी संदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाना अगर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. चाकलासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सासवड विभागाचे निरीक्षक करीत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी व दक्षता, संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक संजय आर.  पाटील, युवराज शिंदे, एस .बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest