माओवादी नक्षलवादी संतोष शेलार पोलिसांना शरण
पुणे: नक्षलवादी चळवळीच्या (Naxalite Movement) विचारांनी प्रभावित झाल्यानंतर सीपीआय माओवादी या नक्षलवादी संघटनेत भरती झालेल्या संतोष वसंत शेलार उर्फ विश्व उर्फ पेंटर (वय ३३, रा. भवानी पेठ, कासेवाडी) या नक्षलवाद्यावर आजारपणामुळे पोलिसांसमोर शरण येण्याची वेळ आली.
७ नोव्हेंबर २०१० पासून बेपत्ता असलेला शेलार हा शारीरिकदृष्ट्या खंगलेल्या अवस्थेत तीन दिवसांपूर्वी घरी आला. मागील १२ वर्षांच्या काळात त्याने पुणे, मुंबई, ठाणे आदी शहरी भागातील तरुणांना नक्षलवादाकडे ओढण्याचा प्रयत्न केला. 'अर्बन नक्षल' घडवण्याच्या प्रक्रियेत तो सक्रिय होता. उत्तम चित्रकार असल्याने त्याला नक्षल चळवळीतील सहकाऱ्यांकडून 'पेंटर'असे संबोधले जात होते. त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर राज्य दहशतवाद विरोधी पथक बारीक लक्ष ठेवून आहे. (Latest News Pune)
राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टीमध्ये राहण्यास होता. त्याचे शिक्षण जेमतेम नववीपर्यंत झालेले आहे. नंतर त्याने शाळा सोडली. परंतु, त्याला रेखाचित्रे काढण्याचा आणि चित्रकलेचा छंद होता. याच काळात तो पुण्यामध्ये कबीर कला मंच (केकेएम) या सांस्कृतिक संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता बनला. कबीर कला मंचवर पुढे माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप झाला. या मंचाचे काही कार्यकर्ते आणि कलाकारांना अटकदेखील झाली होती.
दरम्यान, शेलारवरील माओवादी विचारसरणीचा प्रभाव वाढत गेला. माओवाद्यांनी झोपडपट्ट्या आणि कष्टकरी वस्त्यांमधील उपेक्षित वर्गातील तरुणांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. पुण्यातील ताडीवाला रस्ता भागातील प्रशांत कांबळे आणि शेलार हे दोघेही गायब झाले. शेलारच्या कुटुंबीयांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात १० जानेवारी २०११ रोजी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. शेलार घरामधून जाताना मुंबईला एका प्रदर्शनात काम करण्यासाठी जात असल्याचे कारण देऊन ७ नोव्हेंबर २०१० रोजी बाहेर पडला होता. दोन महिन्यांचे काम असल्याची बतावणी त्याने कुटुंबीयांना केली होती. मात्र, तो परत आला नाही. त्यावेळी तो फक्त २० वर्षांचा होता. कांबळे हादेखील सीपीआय माओवादी संघटनेत भरती झाल्याची एटीएसची माहिती आहे.
बंदी घातलेल्या माओवादी संघटनांनी पुणे, मुंबई, ठाणे परिसरात काम सुरू करून शहरी भागातील तरुणांना माओवादी चळवळीत ओढण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने २०११ साली सीपीआय माओवादी' संघटनेची शीर्षस्थ कार्यकर्ती अँजेला सोनटक्के आणि कबीर कला मंचाच्या कलाकारांसह १४ जणांवर यूएपीएसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात शेलार पोलिसांना हवा होता. गायब झालेला शेलार हा गडचिरोलीमधील भामरागडच्या दुर्गम भागात गेला. तिथे त्याने माओवादी संघटनेसाठी काम सुरू केले. तो सातत्याने माओवादी संघटनेतील वरच्या पातळीवरच्या नेत्यांच्या संपर्कात होता. दरम्यान, गडचिरोली, भामरागड परिसरात पोलिसांच्या पथकावर हल्ले झाले होते. शेलारला माओवादी विचारांनी प्रभावित करण्यात अँजेलासोबतच तिचा पती तथा सीपीआय-माओवादीचा केंद्रीय समिती सदस्य मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे याचाही मोठा सहभाग होता. तेलतुंबडे हा नोव्हेंबर २०२१ मध्ये पोलीस चकमकीत गडचिरोलीमध्ये मारला गेला.
मागील काही महिन्यांपासून शेलार आजारी आहे. उपचारांची आवश्यकता असल्याने शरीराने खंगलेला तो २० जानेवारी रोजी पुण्यात आला. तो घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याची माहिती एटीएसला कळवली. त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने आजारपणातच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करीत असल्याचे सांगितले.
अशी आहे नक्षली म्हणून शेलारची वाटचाल...
गडचिरोली पोलिसांची माओवाद्यांच्या टिपागड दलमच्या ६० सशस्त्र माओवाद्यांसोबत ५ मे २०१४ रोजी मुर्झार जंगलात चकमक उडाली होती. या चकमकीत पोलिसांच्या हाती क्लेमोर माइन्स, वॉकी टॉकीसह नोटबुक, कार्टून आदी साहित्य लागले होते. यामधील नोटबुकमध्ये असलेल्या नावांच्या यादीमध्ये 'विश्व' नावाची स्वाक्षरी होती. शेलार याला माओवाद्यांनी हे नाव दिले होते. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या काही माओवाद्यांनीच ही माहिती पोलिसांना दिली होती. या साहित्यामध्ये त्याने काढलेली चित्रे, रेखाचित्रेदेखील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चित्रकलेतील कौशल्यामुळे त्याला 'पेंटर' असेही म्हटले जात होते. शेलारवर उत्तर गडचिरोली, गोंदिया विभागातील 'प्लॅटून क्रमांक ५६ किंवा प्लाटून बी' मध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्याच्याकडे १२ बोअरची बंदूक देण्यात आली होती. पुढे तो छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील जंगलात सक्रिय झाला. त्याला 'तांडा एरिया कमिटी'चा डेप्युटी कमांडरची जबाबदारी देण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. छत्तीसगड पोलिसांनी २०१९ साली तयार केलेल्या माओवाद्यांच्या यादीत त्याचे नाव २८ व्या क्रमांकावर समाविष्ट करण्यात आले होते. तर, सीपीआय माओवादीच्या 'तांडा एरिया कमिटी' अंतर्गत केलेल्या यादीत 'विश्व'चे नाव चौथ्या क्रमांकावर देण्यात आले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.