संग्रहित छायाचित्र
पुणे : माथाडी नेते असल्याची बतावणी करीत गोदाम मालकाकडे प्रत्येक गाडीमागे १५ हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोघा जणांविरोधात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १२ जानेवारी आणि १७ जानेवारी रोजी उरुळी देवाची येथील गोदामामध्ये घडला. (Pune Crime News)
शेखर अनिल मोडक (वय २९, रा. वडकी), अण्णा देवकर (रा. फुरसुंगी) याच्यासोबत आणखी चार जणांविरोधात भादवि ३८७, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शेखर मोडक याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोहसीन शहाजान शेख (वय ३६, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांच्या मालकीचे लोणी काळभोरमध्ये सर्वे नंबर २८५ / २ या ठिकाणी गोदाम आहे. आरोपींनी १२ जानेवारी आणि १७ जानेवारी रोजी शेख यांची भेट घेतली. 'आम्ही माथाडी बोर्डाचे नेते आहोत. गोडाऊन मधील काम आमचेच कामगार करणार' असे त्यांना धमकावले.
तसेच शेख यांना कोणतीही नोटीस न देता त्यांचे काम बंद करण्यास भाग पाडले. 'काम सुरू करायचे असेल तर प्रत्येक गाडीमागे १५ हजार रुपये द्यावे लागतील. तरच, काम चालू करेल' अशी धमकी दिली. त्यावर शेख यांनी 'आम्हाला माथाडी कामगार ठेवायचे नाहीत. आम्हाला ते परवडत नाहीत' असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी 'किमान एका गाडी पाठीमागे सात हजार रुपये दे. नाहीतर तुझ्या गोडावूनमध्ये येणाऱ्या गाड्या कशा रिकाम्या करतोस तेच बघतो' असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.