बेकायदेशीरपणे दारू वाहतूक केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
बेकायदेशीरपणे हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 22 हजारांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 19) सकाळी पावणे आठ वाजता चापेकर चौक, चिंचवड येथे करण्यात आली.
सोमनाथ बंडू थोटे (वय 24, रा. शेरेवस्ती, ता. मुळशी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित पिंजरकर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलिसांनी संशयावरून चापेकर चौकाजवळ एक कार (एमएच 14/एई 5346) अडवली. तिची झडती घेतली असता कारमध्ये हातभट्टीची दारू आढळून आली. पोलिसांनी 22 हजारांची अवैध हातभट्टीची दारू जप्त केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करत कार चालक सोमनाथ थोटे याला ताब्यात घेतले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.