फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला नऊ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका रिक्षाचालकाची ६ लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २६ जून २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत डांगे चौक, थेरगाव येथे घडला.
सतीश बिराप्पा पारेकर (वय ४०, रा. मुंबई. मूळ रा. सोलापूर) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत काशिनाथ फाले (वय ३५, रा. चिंचवड), गजानन महादेव मोरे (वय २४), दयानंद महादेव मोरे (वय २२), संतोष खुबा राठोड (वय ४५), एक महिला (वय ४०, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पारेकर यांना ते इन्फिनिटी एज्युकेशनल अकॅडमी शेअर मार्केट कंपनीचे संचालक असल्याचे सांगितले. 'माझी स्वतःची शेतजमीन आहे. माझी ३० ते ४० कोटीची संपत्ती आहे.
ही संपत्ती मी इन्फिनिटी एज्युकेशनल अकॅडमी शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंग करून मिळवली आहे. तुम्ही आमच्या इन्फिनिटी एज्युकेशनल अकॅडमी शेअर मार्केट कंपनीमध्ये फॉरेक्स ट्रेडमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला नऊ टक्के दराप्रमाणे परतावा दिला जाईल, असे आरोपींनी आमिष दाखवले.
खोटी बतावणी केली. त्याकरिता करारनामा बनवून आर्थिक फसवणूक करण्याचा उद्देशाने फिर्यादी यांच्याकडून ६ लाख ३५ हजार ५०० रुपये घेतले. सुरुवातीला फिर्यादींना थोड्या फार प्रमाणात परतावा दिला. त्यानंतर कोणताही परतावा न देता तसेच गुंतवणुकीची रक्कम परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. रक्कम देण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादी यांना एक धनादेश दिला. मात्र त्यावर सही चुकीची असल्याचा शेरा देऊन बँकेने तो धनादेश परत केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.