संग्रहित छायाचित्र
चाकण (ता. खेड ) येथे दोन दिवसांपूर्वी एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाचा दगडाने ठेचून दोन अल्पवयीन तरुणांनी निर्घृण खून केला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हीडीओ टाकून दहशतीचा थरार निर्माण केला. अशा घटनांचा मागोवा घेतला तर चाकण (Chakan) परिसरात बाल गुन्हेगारीचा चाकण पॅटर्न उदयाला येतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pimpri Chinchwad Crime News)
चाकण परिसरातील किल्ल्यातील खून, मेदनकरवाडी, बालाजीनगर, पीडब्ल्यूडी मैदान, रोहकल फाटा येथील खुनाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपी अल्पवयीन होते. त्यामुळे चाकण पंचक्रोशीत अल्पवयीन तरुणांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. नव्याने उदयास येत असलेला बाल गुन्हेगारीचा चाकण पॅटर्न सामाजिक दृष्टीने धोकादायक ठरू शकतो.
चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे सहज मिळणाऱ्या पैशाला खूप महत्त्व आले आहे. यामुळे कंपन्यांमध्ये विविध कामांचे ठेके घेण्यासाठी गुन्हेगारी वाढली आहे. परिसरात अल्पवयीन तरुणांचे अनेक ग्रुप, टोळ्या तयार झाल्या आहेत. भाऊ,भाई, दादा,भावा,महाराज आदी नावांनी ग्रुप,टोळ्या सोशल मीडियावर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ॲक्शनमधील फोटो फ्लेक्स,सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांना आणि ग्रुपला गॉडफादर असून,तेच यांना रसद पुरवून त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया करून घेत आहेत. चाकण पंचक्रोशीतील युवक व अल्पवयीन तरुणांनी टोळ्या, ग्रुप बनवायचे आणि त्या माध्यमातून गुन्हेगारी करण्याचा नवा फंडा या परिसरात रुजू होत आहे. गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस, समाजासमोर निर्माण झाले आहे.
चाकण परिसरातील बहुतांश बाल गुन्हेगारांच्या घराची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि घरच्यांचा नसलेला धाक यामुळे ही मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून अशा मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत. पालकांनीही आपल्या पाल्यांकडे जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे आहे.
- राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त.
बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनी संस्कारक्षम वयातच मुलांना चांगल्या-वाईट गोष्टींचे परिणाम काय होतात याची माहिती देणे आवश्यक आहे.आपली मुले,दिवसभर कुठे फिरतात? कोणाबरोबर असतात ? ते नियमित अभ्यास करतात का? याकडे लक्ष द्यायला हवे.
- बाळासाहेब चौधरी, सामाजिक कार्यकर्ते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.